70 वर्षांच्या आजोबाची पी. व्ही. सिंधूशी लग्नाची इच्छा, जिल्हाधिकाऱ्यांना दिला अर्ज

तामिळनाडूमधील रामनाथपूरमचे मलाईस्वामी असं विवाहेच्छुक आजोबांचं नाव

चेन्नई । 'साठी आणि बुद्धी नाठी,' अशी मराठीत म्हण आहे. याचाच प्रत्यय आज तामिळनाडूत आला. जागतिक कीर्तीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूशी लग्न करण्यासाठी एका 70 वर्षांच्या आजोबांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना साकडं घातलं आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरूम जिल्ह्यात ही विचित्र घटना घडली. सिंधूशी लग्नाची इच्छा असलेल्या आजोबांचं नाव मलाईस्वामी असं आहे. फक्त लग्नासाठी अर्ज करूनच ते थांबले नाहीत, तर आपण पी.व्ही. सिंधूचं अपहरण करू, असा इशाराही या बहाद्दर आजोबांनी दिलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या जनता दरबारात जाऊन मलाईस्वामींनी आपले हे अजब गाऱ्हाणे मांडले. 'मला 24 वर्षीय वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन पी. व्ही. सिंधूशी लग्न करायचं असल्याचं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सांगितलं.

जिल्हाधिकारी दर आठवड्याला लोकांची भेट घेत असतात. यावेळी सर्वसामान्य नागरिक आपले गाऱ्हाणे, विविध अर्ज त्यांच्यासमोर मांडतात. परंतु, या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मात्र या अजब मागणीमुळे धक्काच बसला. मलाईस्वामींनी स्वत:चा आणि पी. व्ही. सिंधूचा फोटो एका लिफाफ्यात बंद करून जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवला आणि आपल्याला सिंधूसोबत लग्न करायचं असल्याचं सांगितलं. आजोबा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपला जन्म 4 एप्रिल 2004 रोजी झाल्याचं सांगून आपण केवळ 16 वर्षांचे असल्याचा दावाही केला. सिंधूच्या यशामुळे मी प्रचंड भारावलो असून आपल्याला तिच्याशी लग्न करायचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या प्रकारामुळे उपस्थित सर्वच स्तब्ध झाले होते.AM News Developed by Kalavati Technologies