विधानसभा 2019 : अणुशक्तीनगर मतदारसंघात नवाब मलिक बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेणार?

वंचित बहूजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार

मुंबई । मुंबईतल्या अणुशक्तीनगर मतदारसंघात पुन्हा एकदा सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पहायला मिळणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं पण 2014 मध्ये सेनेनं राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला काबीज केला. त्यामुळं येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी हा बालेकिल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा 172 क्रमांकांचा मतदारसंघ आहे.

शिवसेनेचे तुकाराम काते हे अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मातब्बर नेते नवाब मलिक यांना काते यांनी पराभूत केलं. अवघ्या एक हजार मतांनी नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून पराभूत झाले. हा पराभव मलिक यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. 2014 नंतर मतदारसंघात विकासकामं झाली नसल्याचं मलिक यांचं म्हणणं आहे. तसंच तुकाराम काते हे निवडून आल्यानंतर मतदारसंघात फिरकलेच नाहीत असाही त्यांचा आरोप आहे. मतदारसंघातील जनसंपर्काच्या जोरावर आपणच पुन्हा निवडून येऊ असा मलिक यांना विश्वास आहे.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. यावेळी शिवसेनेच्या तुकाराम कातेंना 39966 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना 38959, भाजपच्या विठ्ठल खरटमोल यांना 23767 आणि काँग्रेसच्या राजेंद्र माहुलकर यांना 17615 इतकी मतं मिळाली होती. मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार दिल्यास याचा निवडणुकीच्या निकालावर स्पष्ट परिणाम दिसू शकतो असं जाणकारांना वाटतं. सध्या वंचित बहुजन आघाडीकडून मतदारसंघातून तुल्यबळ उमेदवाराचा शोघ घेतला जात आहे. वंचितकडे इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे. त्यामुळे वंचितची भूमिका निवडणुकीत अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून विजयासाठी पुन्हा एकदा पक्ष संघटनेच्या जोरावर तयारी करत आहेत. गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात जात आहे. नवाब मलिक यांच्याकडे आता मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद असल्यामुळे पक्षाची मोठी ताकद त्यांच्यामागं आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी आपलं वर्चस्व असलेला मतदारसंघ पुन्हा मिळवणार का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies