विधानसभा 2019 : धारावी विधानसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांची उमेदवारी निश्चित! महायुतीकडून कोण याची उत्सुकता

झोपडपट्टीशी निगडीत प्रश्न महत्वाचे

धारावी । काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता आहे. धारावी विधानसभा मतदारसंघ हा 178 क्रमांकांचा मतदारसंघ आहे. मुंबईतल्या विधानसभा मतदार संघांपैकी सर्वात वेगळा मतदारसंघ म्हणून धारावी मतदारसंघाकडं बघितलं जातं. आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून या परिसराची ओळख. या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, मोठ्या प्रमाणात नागरिक इथं राहतात. याशिवाय शेकडो छोटे मोठे लघु उद्योगही परिसरात केले जातात. अनेक जाती धर्माच्या लोकांचं वास्तव्य इथं आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. इथे 33 टक्के मुस्लिम, 25 टक्के मराठी, 25 टक्के दक्षिण भारतीय तर 5 टक्के गुजराती समाजाचे मतदार आहेत.

2004 पासून ते 2014 पर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड धारावीतून सातत्यानं विजयी झाल्या. 2014 च्या निवडणुकीत मुख्य चारही पक्ष वेगवेगळे लढले. त्यामुळं प्रत्येक पक्षाची ताकत या मदारसंघात दिसून आली. 2014 मध्ये मोदी लाट असूनही वर्षा गायकवाड या मोठ्या मताधिक्यानं जिंकून आल्या होत्या.


या वेळेसही काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे. आघाडीकडून त्या उमेदवार असतील. तर भाजप आणि शिवसेना युतीतुन लढणार असल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे यावेळी युतीचा उमेदवार कोण असणार आहे यावर आजून प्रश्न चिन्ह आहे. या जागेसाठी शिवसेना आग्रही असली तरी भाजपच्या दिव्या ढोले यांनी या मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. तर शिवसेनेचे बाबुराव माने आणि मनोहर रायबागे हे देखील निवडून लढवण्यासाठी सज्ज झालेत.

भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षात धारावीसाठी काहीही केलं नसल्याचं मतदारांच म्हणणं आहे. 2004 पासून धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीचा पुनर्विकास प्राधान्याने केला जाईल, असं स्पष्ट केलं होते. आता सरकारला पाच वर्षे पूर्ण होत आलीत. पण अद्याप विकासक निश्चित होऊ शकलेला नाही. भाजप सरकारने सुरुवातीला 2016 मध्ये जागतिक पातळीवर निविदा जारी केल्या. परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे धारावीचे केलेले पाच भाग रद्द करून एकात्मिक विकासासाठी अलीकडेच निविदा जारी करण्यात आल्या असल्या तरी त्या पलीकडे काहीही झालेलं नाही. तसंच तीन टर्म आमदार राहिलेल्या वर्षा गायकवाड यांनी मतदार संघाच्या विकासाकडे लक्ष दिलं नसल्याचाही आरोप जनतेतून होताना दिसतोय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धारावी विधानसभा मतदार संघातून काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे विजयी उमेदवार राहुल शेवाळे यांना पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies