सत्तास्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भेट

युती तुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भेट झाली आहे.

पुणे | महाराष्ट्रात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. जवळपास महिनाभर हे सत्तानाट्य सुरू होती. यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर ते आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोहगाव विमानतळावर भेटले.

पंतप्रधान मोदींच्या स्वागताला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही पुणे विमानतळावर उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे एकत्र स्वागत केले. यावेळी केंद्रिय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची देखील उपस्थिती होती. मोदींच्या स्वागतानंतर उद्धव ठाकरे पुणे विमानतळावरून एअर फोर्स स्टेशनकडे रवाना झाले. युती तुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भेट झाली आहे.

दरम्यान, पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय वार्षिक पोलीस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या या परिषदेला पहिल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थिती लावत मार्गदर्शन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी व रविवारी या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता लोहगाव विमानतळावर त्यांचे आगमन झाले.AM News Developed by Kalavati Technologies