काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची गुलामगिरी थांबवा, असदोद्दिन ओवैसी यांचे आवाहन

देशासाठी आम्हीही बलिदान दिले आहे, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले

परभणी । गेल्या कित्येक वर्षापासून मुस्लीम समाजातील काही पुढारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची गुलामगिरी करण्यातच धन्यता मानत आले आहेत. मुस्लीम समाजाने अशा पुढा-यांपासून कोसो दूर रहावे व औरंगाबादच्या नागरिकांप्रमाणे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात साकारावे, असे आवाहन एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असदोद्दिन ओवैसी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खा.ओवीसी यांची बुधवारी सायंकाळी दर्गा रस्त्यावर मोठी जाहीर सभा झाली. एमआयएमचे अधिकृत उमेदवार अली खान मोईन खान यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेत खा.इम्तियाज जलील, माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन, ज्येष्ठ नेते रशीद इंजिनिअर, उमेदवार अली खान मोईन खान, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.इम्तियाज खान, शहराध्यक्ष शेख अखील, नगरसेवक सय्यद माजीद, नगरसेवक जाकेर लाला, रफियोद्दीन अशरफी,शाकेर खान, जाकेर अहेदम खान, इम्रान रुबी, अब्दुल खालेद, मौलाना रफियोद्दीन आदी व्यासपीठावर विराजमान होते.

आपल्या भाषणातून खा.ओवीसी यांनी काँग्रेस आघाडीसह युती सरकारवर कडाडून हल्ला चढविला. विशेषतः मुस्लीम समाजाचा काँग्रेस आघाडीने सातत्याने व्होटबँक म्हणून वापर केला. समाजातील काही पुढा-यांनी सुध्दा या दोन्ही पक्षाचील गुलामगिरी करण्यातच धन्यता मानली. त्यातून स्वतः स्वार्थ साधला. मुस्लीम समाज ही आजही जैसा थे अवस्थेत राहिला आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात उर्जित अवस्था प्राप्त होण्याकरिता मुस्लीम समाजाने औरंगाबादच्या नागरिकांप्रमाणे स्वप्न पाहवी व परभणीतील उमेदवारास विजयी करण्याकरिता एमआयएमचे अली खान यांना भरघोस मतदान करावे, असे आवाहन केले.

मुस्लीम समाजास दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न
मुस्लीम समाजाला सातत्याने बदनाम करण्याकरिता खोटेनाटे आरोप अवलंबिले गेले आहेत. विशेषतः स्थानिक आमदारांने विधानसभेत शहरातील शंभर युवक ईसीसच्या संपर्कात असल्याचा विधीमंडळात खोटानाटा आरोप केला. त्याद्वारे समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आला आहे. परंतू तमाम मुस्लीम बांधवांनी या गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे. हा देश म्हणजे कोणाच्या बापाची जहागिरी नाही. या देशासाठी आम्हीही बलिदान दिले आहे, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. मुस्लीम समाजाकडे संशयाकडे पाहण्याचे धोरण तात्काळ थांबविले पाहिजे, असे मत ही खा.जलील यांनी व्यक्त केले.AM News Developed by Kalavati Technologies