नाराज असलेल्या अब्दुल सत्तारांच्या वाट्याला उद्धव ठाकरेंकडून महत्त्वाची खाती

केवळ राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्यामुळे शिवसेनेचे सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार हे नाराज होते.

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सहा दिवस उलटून गेल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली. यानंतर खातेवाटपाची अधिकृत यादी समोर आली. दरम्यान, खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या पारड्यामध्ये महत्त्वाची खाती टाकली आहे. राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून सत्तारांचा समावेश झाला. सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य या खात्यांची जबाबदारी असणार आहे.

केवळ राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्यामुळे शिवसेनेचे सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार हे नाराज होते. ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात होते. यानंतर शनिवारी राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. आधीच नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपास विलंब होत होता. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या नाराजीने शनिवारी शिवसेनेची चिंता वाढली होती. राज्यमंत्रिपदावरच बोळवण झाल्याने सत्तार यांनी खातेवाटप होण्यापूर्वीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचेही वृत्त धडकले होते. मात्र माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यशस्वी शिष्टाई करत सत्तार यांची नाराजी दूर केली.. दरम्यान, आज अब्दुल सत्तार हे आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेण्याची शक्यता आहे.AM News Developed by Kalavati Technologies