संगमनेर । उद्धव ठाकरे आज प्रचारासाठी अहमनदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन केला. विशेष म्हणजे राजकारणापासून अलिप्त राहून सरपटणाऱ्या नवनवीन प्राण्यांचा शोध घेणारे तेजस ठाकरे हेही उद्धव ठाकरेंच्या सोबतीला होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांचे धाकटे भाऊ तेजस ठाकरे हे पहिल्यांदाच राजकीय मंचावर दिसले. यामुळे सुपुत्र तेजस ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तसेच त्यांच्या सभास्थानी असलेल्या उपस्थितीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेजस ठाकरे हे फक्त सभा पाहण्यासाठी आले आहेत.ते जंगलात रमणारे माणूस आहेत, असे स्पष्ट करत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी आता घरी बसायला हारकत नाही. त्यांचे नेते बँकॉकमध्ये गेले आहेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. ‘ते थोरात, आम्ही जोरात’ त्यामुळे अहमनदनगर जिह्यात 12-0 असा निकाला लागणार असून, संगमनेरमध्ये भगवा फडकरणारच असा विश्वासही त्यांनी बुधवारी व्यक्त केला. साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, कोणी कितीही डोके आपटले तरी नगर जिह्यात भगवा फडकणारच. कामे मार्गी लागली असल्यानेच पुन्हा युती झाली आहे. आता युती झाल्याने वादावादी नको. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. तसेच एक रुपयामध्ये प्राथमिक आरोग्य चाचण्या करुन देण्याची सोय करणारच. ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांची मी माफी मागतो, असेही त्यांनी सांगितले.