कुकडी प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी मिळाला मोबदला, रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश

कुकडी प्रकल्पासाठी कर्जत तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाकडून संपादित करण्यात आल्या होत्या

अहमदनगर । कर्जत तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना कुकडी प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतजमिनीचा भु-संपादन मोबदला आज मिळाला. यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला, त्याला यश आले. तालुक्यातील कोळवडी या गावांमधील पाटबंधारे विभागाच्या कुकडी प्रकल्प कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना आज त्यांच्या जमिनींचे पैसे धनादेशाद्वारे देण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार, कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक अभियंता एच टी धुमाळ, प्रांताधिकारी अर्चना नसते, कार्यकारी अभियंता रामदास जगताप, यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

कुकडी प्रकल्पासाठी कर्जत तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाकडून संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र त्या या भु-संपादनाचा मोबदला पंचवीस ते तीस वर्ष झाले तरी शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून सुमारे 54 गावांच्या भु-संपादन मोबदल्यासाठी प्रयत्न केले. सध्या तालुक्यातील जळकेवाडी, राशीन, येसवडी, धालवडी, बारडगाव दगडी, तळवडी अशा एकुण 6 गावांचा भु-संपादन मोबदला मंजुर झाला असुन उर्वरीत गावांनाही हा मोबदला मिळण्यासाठी आमदार पवार यांच्याकडुन पाठपुरावा सुरूच आहे. मंजुर झालेल्या 6 गावांना सुमारे 26 कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जळकेवाडी गावातील 62 लाभार्थीना 6 कोटी 85 लाखांचा मोबदला प्रातिनिधीक स्वरूपात 'मोबदला वाटपाचे पत्र' व 'धनादेश' देऊन वाटप करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील 104 गावातील शेतकऱ्यांची भूसंपादनाची प्रस्ताव प्रलंबित होती. यामध्ये 54 गावातील शेतकऱ्यांची प्रस्ताव जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. आज काही शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येत आहे. शेतकरी या मोबदल्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. काही शेतकऱ्यांच्या पिढ्या यामध्ये गेल्या. परंतु त्यांना पैसे मिळाले नव्हते.AM News Developed by Kalavati Technologies