धक्कादायक! धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने 2 तरूण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात घडली आहे

नाशिक । देवळा तालुक्यातील दहिवड परिसरातील चोरचावडी धबधब्यावर पोहण्यासाठी आलेल्या वडाळीभोई येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या दोन तरूण मित्रांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सतत दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या चांदवड, देवळा तालुक्यात गेल्या वर्षांपासून बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने चांदवड देवळा तालुक्याच्या सीमेवर डोंगर भागात देवळा तालुक्यातील दहिवड परिसरात असलेला, चोरचावडी धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करत आहे.

धबधबा पाहण्यासाठी व धबधब्यावर पोहण्यासाठी जवळपासच्या तालुक्यातील अनेक तरूण रोजच येत असतात. त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले अठरा वर्षीय पाच तरूण धबधबा पाहण्यासाठी आले होते. सर्व पाचही मित्रांनी ग्रुप फोटो काढून पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी धबधब्याच्या खालील पाण्यात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम गुजर व ऋषीकेश तोटे हे पाण्यातील भवऱ्यात अडकून पाण्याखाली बुडाले. पाऊस पडत असल्याने त्यातील सागर प्रकाश जाधव याने कपारीला घट्ट धरून ठेवल्याने तो बचावला.

पाण्यातच थोड्या अंतरावर असलेल्या अजिंक्य व संकेतला सागरने हाक मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत शुभम गुजर व ऋषीकेश तोटे पाण्यात बुडवून गेले होते. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या तरूणांनी सागरला पाण्याच्या बाहेर काढले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील युवकांनी पाण्यात बुडालेल्या शुभम व ऋषीकेश यांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा दोघांचे शवविच्छेदन करून वडाळीभोई येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies