आश्चर्याचा धक्का! गिरीश महाजनांच्या सेल्फीवरून एकनाथ खडसे म्हणतात…

एकनाथ खडसे हे कायम महाजनांना टोले लगावत असतात

जळगाव । कोल्हापूर सांगलीच्या महापूरात मदत कार्यासाठी गेलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी प्रकरणामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. त्यावर महाजनांनी स्पष्टीकरण दिलं आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांचा बचाव केला. आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही गिरीश महाजन यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. महाजन आणि खडसे यांच्यात तसं राजकीय सख्य नाही. महाजनांना पुढे करायचं असल्यामुळेच आपला पत्ता कापला असं एकनाथ खडसेंना वाटतं. तसं त्यांनी अप्रत्यक्षरित्या अनेकदा बोलूनही दाखवलं. त्यामुळे खडसे यांच्या या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एकनाथ खडसे हे कायम महाजनांना टोले लगावत असतात. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी महाजनांचा केलेला बचाव विशेष समजला जातो. आपल्यावर झालेल्या आरोपांचा हवाला देत गिरीश महाजनांचा खडसेंनी बचाव केला. खडसे म्हणाले, कोल्हापूर, सांगली साताराच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाजन यांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी मदत पोहचली. एवढच काय तर स्वत:ही पाण्यात उतरून त्यांनी पूरग्रस्तांना वाचविण्यात पुढाकार घेतला. मात्र महाजनांनी केलेल्या मदतीपेक्षा मध्यमांनी त्यांच्या सेल्फीलाच प्राधान्य देत त्यांच्यावर टीका केली.

खडसे म्हणाले, माध्यमांच्या टीकेचा मलाही फटका बसला आहे. मी केलेल्या चांगल्या कामांपेक्षा दाऊदच्या बायकोशी आपले संबंध असल्याचे पसरविल्या गेले. माध्यमांनी कोणत्याही वृत्ताची खात्री करूनच ते प्रसिद्ध करावे आणि आपली विश्वासर्हता वाढवायला हवी, असे खडसे म्हणाले. टीआरपीच्या नादात माध्यमांनी आपण केलेल्या विधानांचा विपर्यास करून दाखवल्याचा आरोप खडसेंनी केला. पाचोरा तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.AM News Developed by Kalavati Technologies