शिवसेनेत दाखल झालेले काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळेंविरोधात शिवसेनेची बॅनरबाजी

आज श्रीरामपूर शहरभर आमदाराला पाडायचंय अशा प्रकारचे अनेक बॅनर अज्ञात व्यक्तींनी लावले आहेत.

अहमदनगर | श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सगळ्या गटांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ससाणे, विखे आणि नंतर थोरातांची साथ सोडणारे काँग्रेसचे आमदार आता शिवसेनेत दाखल आहे. मात्र तिथेही त्यांना विरोध होताना दिसतोय. आज श्रीरामपूर शहरभर आमदाराला पाडायचंय अशा प्रकारचे अनेक बॅनर अज्ञात व्यक्तींनी लावले आहेत.

आदिक, मुरकुटे ससाणे अशा दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ असलेला श्रीरामपूर मतदारसंघ 2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. यानंतर येथील राजकारणाला कलाटणी मिळाली. एक सामान्य दुकानदार जयंत ससाणे आणि विखे पाटील यांच्या साथीने श्रीरामपूरचा आमदार झाला. राजकारणाचा कोणताही गंध नसलेले भाऊसाहेब कांबळे जनसामान्यामधे मिसळून राहणारा माणूस म्हणून श्रीरामपूरच्या जनतेही त्यांना सतत साथ दिली. मात्र भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर नगरपालीकेच्या निवडणुकीत ससाणेंची साथ सोडत महाआघाडीत प्रवेश केला. तेव्हापासून ससाणे गट कांबळे यांच्यावर प्रचंड नाराज आहे. स्वर्गीय जयंत ससाणेंना ख-या अर्थाने कांबळेची साथ हवी असताना त्यांनी सोडलेला हात ससाणेंच्या जिव्हारी लागला होता.

विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले भाऊसाहेब कांबळे यांना विखे पाटील यांनी यावेळी लोकसभेची काँग्रेसची उमेदवारीही दिली होती. मात्र सुजय विखे यांच्या जागावाटपाच्या आणि भाजपा प्रवेशाच्या घडामोडीमुळे विखे पाटील यांनी कांबळे यांना थांबण्याचा सल्ला दिलेला असताना त्यांनी विखेंचे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा हात धरला आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढवली. या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांचा दारूण पराभव झाला आहे. स्वतःच्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातही कांबळे आघाडी मिळवू शकले नाही.

आता आपण काँग्रेसच्या तीकीटावर आमदार होणार नाही अशी कांबळेची धारणा झाल्याने कदाचित त्यांनी शिवबंधन बांधले आहे. मात्र शिवसैनिकही त्यांच्या मागे उभे रहायला तयार नाहीये. अगोदरच ससाणे, विखेपाटील, बाळासाहेब थोरात यांची कांबळेवर नाराजी असताना शिवसैनिकही नाराज झाले आहे. त्यामुळे यावेळी आमदाराला पाडायचंच अशा प्रकारची बॅनरबाजी करून भाऊसाहेब कांबळे अज्ञात व्यक्तींनी इशारा दिलाय. ऐनवेळी भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे काँग्रेसला उमेदवाराची शोधाशोध करावी लागतेय. युतीच्या जागावाटपात श्रीरामपूरची जागा सेनेकडे असल्याने सेनेच्या इच्छूकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यातच भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने आता शिवसैनिकही संतापले आहे. भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात सगळ्या गटांची असलेली नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



AM News Developed by Kalavati Technologies