अहमदनगरमध्ये शिपायाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शहरात संताप

पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

अहमदनगर । शाळेत आलेल्या विद्यार्थीनीचा विनयभंग करणार्‍या शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील रेसिडेन्सिअल हायस्कूलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. आत्माराम बापुराव लगड असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी आणि बुधवारी अशा दोन वेळेस शिपायाने मुलीशी गैरवर्तन केले. पीडित मुलीची आई धुणीभांडी करत असून हे कुटुंब उदरनिर्वाहाकरीता नगरमधील सावेडी उपनगरात वास्तव्यास आहे. या कुटुंबातील मुलगी शहरातील रेसिडेन्सिअल हायस्कूलमध्ये शिक्षण घेते. सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली. शिपाई असलेल्या लगडने तिच्याशी सातवीच्या वर्गातच लज्जास्पद वर्तन केले. नको त्या ठिकाणी हात लावत तिच्याशी अश्लिल चाळे केले. शिपायाने बुधवारी परत तसेच कृत्य केले. त्यामुळे मुलीने झालेला प्रकार घरी पालकांना सांगितला.

पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. लगड यांच्याविरूद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शाळेच्या शिपयाकडूनच, असे वर्तन होत असेल तर मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील नामांकित शाळेत हा प्रकार घडल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. निवृत्तीला काही दिवस शिल्लक राहिली असताना शिपायाने शाळेतीलच मुलीशी गैरवर्तन केल्याने शाळेच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे. पालकवर्गमध्ये याविषयी संतपाची भावना निर्माण झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies