ठेवीदारांना 33 लाखांचा गंडा घालणाऱ्या महाठकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आमिषं दाखवून त्याने अल्पावधीतच बाराशे ते तेराशे लोकांकडून जवळपास 33 लाख रुपयांच्या ठेवी जमा करून घेतल्या

शिर्डी ।  सर्वसामान्य ठेवीदारांना विविध आमिषं दाखवून, लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्याला राहाता पोलिसांनी अखेर गजाआड केलं. नितीन सुरेश थोरात असं या महाभागाच नाव असून, त्याने खाजगी कंपनीच्या माध्यमातून जवळपास बाराशे ठेवीदारांना 33 लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलय.

नितीन सुरेश थोरात यानं शिर्डी जवळील साकुरी येथे काही महिन्यांपूर्वी साईदत्त अर्बन मल्टीपल निधी नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून आकर्षक व्याजदराचे तसेच विविध स्वरुपातील कर्जाचे आमिषं दाखवून त्याने अल्पावधीतच बाराशे ते तेराशे लोकांकडून जवळपास 33 लाख रुपयांच्या ठेवी जमा करून घेतल्या. सर्वसामान्य लोकांनी देखील या ठकसेनावर विश्वास ठेवत आपआपल्या कुवतीनुसार गुंतवणूक केली. मात्र या भामट्याने ठेवीदारांचा विश्वासघात करत ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीला टाळे लावून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच ठेवीदारांनी थेट राहाता पोलिस ठाणे गाठले आणि या ठकसेनाविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील याची तक्रार करण्यात आली होती. तेंव्हापासून पोलिस थोरात याच्या मागावर होते. अखेर 9 सप्टेंबर रोजी काही ठेवीदारांच्या मदतीने राहाता पोलिसांनी त्याला कोल्हार येथून ताब्यात घेतले. थोरात याला ताब्यात घेतल्याचे समजताच ठेवीदारांनी राहाता पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. यावेळी ठकसेन नितीन थोरात सह कंपनीच्या ईतर संचालक मंडळावर देखील कारवाई करावी आणि आमचे पैसे आम्हाला लवकरात लवकर परत मिळावेत अशी मागणी ठेवीदारांनी केली.

बदरम्यान नितीन सुरेश थोरात याच्या विरोधात भादवी कलम 420, 407/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने या आगोदर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोल्हार, नेवासा, नगर ईत्यादी ठिकाणी देखील विविध नावाने कंपन्या सुरू करून, सर्वसामान्यांना अशाच पध्दतीने गंडा घातल्याचं समोर येतय. त्यामुळे पोलिस तपासात आणखी काय उघड होत याकडे सर्वांचं लक्ष आहे.AM News Developed by Kalavati Technologies