बंदुकीतून गोळ्या झाडून एकाची हत्या, राहाता तालुक्यातील लोणी गावातील घटना

पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असुन, फारार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत

शिर्डी । दोन गटात शाब्दिक वादातुन झालेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना राहाता तालुक्यातील लोणी गावात घडली आहे. लोणी पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असुन, फारार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत.

लोणी गावातील अगदी वर्दळीच्या ठिकाणी हसनापूर रस्त्यावर साई छत्रपती या हॉटेलच्या आवारात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली. या गोळीबारात श्रीरामपुर येथील 18 वर्षीय फरदिन कुरेशी या युवकाचा उपचारा दरम्यान रात्री मृत्यू झाला. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार उमेश नागरे, अक्षय बनसोडे, सुभाष कदम, अरुण चौधरी हे चौघे राहणार लोणी येथील, तर संतोष सुरेश कांबळे, सिराफ उर्फ आयुब शेख, शहारूख शहा पठाण, फरदिन उर्फ भैय्या आबू कुरेशी राहणार श्रीरामपुर हे सात जण दारू पिण्यासाठी आणि जेवणासाठी साई छत्रपती या हॉटेलमध्ये आले होते. यावेळी त्यांची हॉटेलच्या आवारातच आपआपसात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या शाब्दिक बाचाबाचीतूनच या सात पैकी एकाने फरदिन उर्फ भैय्या आबू कुरेशी याच्यावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे कुरेशी हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर इतर सर्व जण फरार झाले आहेत. या प्रकारामागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आर्थिक देवाण घेवाणीतून हा प्रकार घडल्याचा, पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असुन आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याचे विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितलं.AM News Developed by Kalavati Technologies