नेवासा | जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदारसह 35 आंदोलकांवर गुन्हा दाखल

रास्तारोको पुढे ढकलण्यात यावा किंवा रद्द करण्यात यावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.

अहमदनगर | नेवासा तालुक्यात भाजपच्या वतीने दूध दरवाढीसाठी शनिवारी ( १ आँगस्ट ) शहरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह भाजपच्या 30 ते 35 पदाधिकारी यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पो.कॉ. प्रतापसिंह भगवान दहिफळे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरुन उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्यासह 30 ते 35 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दि 1 आँगस्ट रोजीच्या रास्तारोकोला परवानगी नाकारली होती. रास्तारोको पुढे ढकलण्यात यावा किंवा रद्द करण्यात यावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र तरीही भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष गोंदकर, माजी आमदार मुरकुटे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे, ज्ञानेश्वर पेचे, राजेश कडू, ज्ञानेश्वर टेकाळे, निरंजन डहाळे, रामचंद्र खंडाळे, विवेक ननवरे, संदीप आलवणे यांच्यासह इतर आंदोलकांनी नेवासा पंचायत समितीसमोर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. तसेच सोशल डिस्टेसिंगचे उल्लंघन केले. यावरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies