धरणाचे पाणी जमिनीत शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

मागील वर्षाचा कोरड्या दुष्काळाचा सामना करत करत बळीराजाने या वर्षात कर्ज काढून जेमतेम शेतात पेरणी केली

जळगाव । पारोळा तालुक्यातील लोणी येथून जवळच असलेले एमआय टँक हे धरण या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. या एमआय टँक च्या जवळच असलेल्या परंतु भू संपादित न झालेल्या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने या शेतातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतातील खरीप हंगामाची पिके पूर्णतः हातातून गेली आहे.

मागील वर्षाचा कोरड्या दुष्काळाचा सामना करत करत बळीराजाने या वर्षात कर्ज काढून जेमतेम शेतात पेरणी केली. मात्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली व नद्या, नाले, पाझरतलाव, धरणे तुडुंब भरली आहेत. झपाट्याने जलपातळी वाढली व याचाच फटका लोणी येथील शेतकऱ्यांना बसला असून भूसंपादित न झालेल्या शेतशिवारात या जलाशयाचे पाणी घुसून कापूस, ज्वारी, मका, बाजरी इतर कडधान्य हातची गेली. यामुळे अनेक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या धरणपरिसराचे व्यतिरिक्त इतर क्षेत्रात पाणी घुसल्याने आसपासच्या शेतकऱ्यांच्या शेताचे त्वरित पंचनामे करुन संबंधित विभागाकडून त्वरित नुकसान भरपाई मीळावी तसेच पाटबंधारे विभागाकडून हे क्षेत्र अधिग्रहण करुन या शेतजमिनीचा मोबदला त्वरित मिळावा अशी मागणी नूकसान ग्रस्त शेतकरी करीत आहे.AM News Developed by Kalavati Technologies