लेणापूरच्या सप्तकुंडात 300 फुटांवरून कोसळला पर्यटक, पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले

पर्यटकाला पोहता येत असल्याने तो एका कपारीच्या साहाय्याने तब्बल अडीच तास पाण्यात होता

औरंगाबाद । अजिंठा लेणीच्या बाजूला असलेल्या लेणापूरच्या डोंगरातील सप्तकुंडात एक पर्यटक गुरुवारी दुपारी पाय घसरून पडला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी त्यास सुखरूप कुंडातून बाहेर काढले. यामुळे अनर्थ टळला. अशोक भाऊसाहेब हुकांडे (रा. बांद्रा, मुंबई) असे या पर्यटकाचे नाव आहे. हुकांडे हे लेणापूर डोंगरातील निसर्गसौंदर्य बघण्यासाठी लेणीच्या माथ्यावर चढला व येथील सप्तकुंड धबधब्याजवळ गेला. तेथे पाण्यात त्याने मनसोक्त भिजून आनंद घेतला; पण पाण्यात शेवाळ असल्याने नकळतपणे ते 300 फूट खोल असलेल्या सप्तकुंडात पडले.

त्यांनी आरडाओरड केल्याने आसपास असलेल्या लोकांनी ही माहिती पुरातत्त्व अधिकारी डी. एस. दानवे यांना दिली. त्यांनी लगेच दोरी व बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य मागवून नागरिक व पुरातत्त्व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कसरत करून बाहेर काढले. पर्यटकाला पोहता येत असल्याने तो एका कपारीच्या साहाय्याने तब्बल अडीच तास पाण्यात होता. त्यामुळे त्याचा थरकाप सुटला होता. शिवाय खोल कुंडात असल्याने त्याला दोरीला लटकवून वर ओढण्यात आले. यामुळे तो प्रचंड घाबरला होता; पण पाणी व कुंड खोल असल्याने दुसरा पर्याय नसल्याने त्याला शर्थीचे प्रयत्न करून वाचवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्याला बाहेर काढल्यावर फर्दापूर व नंतर अजिंठा येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. आता त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती दानवे यांनी दिली.



AM News Developed by Kalavati Technologies