सावधान ! परभणीत बाहेर जिल्ह्यातील येणारे नागरिक होणार क्वारंटाईन

महापालिकेकडून होणार वैद्यकीय तपासणी

परभणी । परभणी जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातुन येणार्‍या नागरिकांमुळेच दिवसेंदिवस रूग्ण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने बाहेरून येणार्‍या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.
परभणी जिल्ह्यात आजवर आढळलेल्या रूग्णांमध्ये बहुतांश रूग्ण हे बाहेर जिल्ह्यातुन आलेले आहेत. आजवर जिल्ह्यात 132 रूग्ण आढळलेले आहेत. सुरूवातीपासून जिल्हा प्रशासनाने संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने कडक पाऊले उचलली आहेत. परंतु बाहेरगावातुन येणारे नागरिकच संक्रमीत होत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील वसमत रोडवरील खानापुर नाका, जिंतूररोडवरील विसावा कॉर्नर व गंगाखेड रोडवर वैद्यकीय पथकाद्वारे बाहेरगावाहुन येणार्‍या नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात असुन, त्या नागरिकांना रेणूका मंगल कार्यालयात क्वारंटाईन केले जात आहे. नजर चुकवणूक येणार्‍या नागरिकांचाही शोध घेतला जात असून अशा नागरिकांवर कारवाई करत त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. तर परवाना नसलेल्या नागरिकांना शहरात प्रवेश बंदी केली आहे. एकंदरीतच परभणी जिल्ह्यात आता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने कडक पाऊले उचलली जात असून नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies