परभणीच्या भूमिपुत्राची पृथ्वी प्रदक्षिणा, 3 वर्षे 3 दिवस अन् 5 खंडांतील 35 देशांचा ध्येयवेडा फेरफटका

जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही म्हण प्रचलित आहे. याच परभणी जिल्ह्यातील कात्नेश्वर येथील युवक तब्बल 3 वर्षे 03 दिवसांत जमिनीमार्गे पृथ्वीवरील पाच खंड व 35 देशांमध्ये यशस्वीरीत्या भ्रमंती करून आज परभणीच्या भूमीत परतला.

परभणी । जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही म्हण प्रचलित आहे. याच परभणी जिल्ह्यातील कात्नेश्वर येथील युवक तब्बल 3 वर्षे 03 दिवसांत जमिनीमार्गे पृथ्वीवरील पाच खंड व 35 देशांमध्ये यशस्वीरीत्या भ्रमंती करून आज परभणीच्या भूमीत परतला.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील विष्णूदास शेषराव चापके या तरुणाचे शिक्षण पूर्णा येथील गुरुबुद्धीस्वामी विद्यालयात झाले. यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण केले. फ्री प्रेसमध्ये पत्रकारिता करत असताना 2010 मध्ये बोटीद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारे कमांडर दिलीप दोंडे यांची मुलाखत घेण्याचा प्रसंग आला. या मुलाखतीदरम्यान त्यांच्या मनाने आपणही आपणही पृथ्वी प्रदक्षिणा करावी असा निश्चय केला. त्यानंतर चापकेंनी यासंदर्भात सखोल असा अभ्यास केला. परंतु हा प्रवास मोठा खर्चिक असल्याने व आपल्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी हा विचार थोडा बाजूला ठेवला.

2016 मध्ये 2 महिन्यांची रजा असताना आपण कुठेतरी फिरायला जावे, असा मानस त्यांनी मित्रांकडे व्यक्त केला. त्यावर मित्रांनी विविध राज्यांसह देशभरात असलेल्या मित्रांकडे जाण्याचा सल्ला दिला. यावरूनच कोलकातामार्गे थायलंड असा जमिनीवरून प्रवास करून परतण्याचे ध्येय समोर ठेवून 19 मार्च 2016 रोजी ठाणे येथून विष्णुदास चापकेंनी प्रवासास प्रारंभ केला. यानंतर थायलंडपर्यंतचा प्रवास अगदी समाधानकारक झाल्यावर तेथून परतण्याचा विचार करत असतानाच एका मैत्रिणाचा फोन आला व पुढचा प्रवास करणार का, असा प्रश्न विचारताच चापके यांनी होकार दिला. यानंतर सुरुवातीला फक्त दोन ते तीन महिन्यांची ठरलेली त्यांची ही भटकंती तब्बल 3 वर्षांचा प्रवासा करून पूर्ण झाली.

विष्णुदास चापके यांच्या जगभ्रमंतीदरम्याचे काही फोटोज त्यांच्या फेसबुक वॉलवरून साभार...[/caption]

प्रत्येक देश फिरताना मित्र-मैत्रिणींनी आर्थिक व मानसिक आधार दिल्याचेही विष्णुदास आवर्जून सांगतात. लॅटीन अमेरिकेत असताना जवळचे पैसे संपले. त्यानंतर वडिलांनी पुढील प्रवासासाठी घरची जमीन विक्री करण्याचे ठरवले. ही बाब मित्र-मैत्रिणींना समजताच त्यांनी वर्गणी गोळा करून पुढील प्रवासाची तजवीज करण्यास सुरुवात केली. याच वेळी मुंबई येथील राजभवनाचे पीआरओ उमेश काशीकर यांनी टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून दिली. त्यामुळेच जगभरातील 5 खंडांतील 35 देश फिरून तब्बल 3 वर्शे 03 दिवसांनी त्यांनी परत भारतात पाय ठेवला.

परभणीच्या मातृभूमीवर पाय ठेवताच चापके यांनी आपल्या आईला पाहताच मिठीच मारली. या वेळी उपस्थित असलेल्या सर्वांची मने गहिवरून आली होती. परभणी रेल्वेस्थानकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यापुढील काळातही समाजसेवा करण्याचा मानस असून जगभरातील देशांत फिरताना आलेला अनुभव यापुढील काळात आपण सर्वांसोबत शेअर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरातील 35 देश फिरतांना आपणास भारतीय संस्कृतीच श्रेष्ठ असल्याचे जाणवते. भारताची संस्कृती 5 हजार वर्षांपूर्वीची असून इतर देशांतील संस्कृती ही केवळ 500 ते 100 वर्षांपूर्वीची आहे. इतर देशांपेक्षा आपल्या देशात खूप काही आहे. परंतु योग्य नियोजन व मेहनत केल्यास निश्चितच आपणही सक्षमपणे उभे राहू, असे विष्णुदास चापके यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies