अजिंठालेणीने पांघरला हिरवा शालु, सप्तकुंड धबधबाही खळखळला

रिमझिम पावसाच्या सरींनी अजिंठालेणीला तिचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करून दिले असून हिरवा शालू पांघरलेल्या या अजिंठालेणीचे मोहक रुप आता पर्यटकांना खुणावत आहे

औरंगाबाद | अजिंठा लेणी परीसरात बरसलेल्या जोरदार पावसाने अजिंठालेणीने हिरवा शालु पांघरला आहे. हिरवा शालू पांघरून नव्या नवरी प्रमाणे नटलेल्या अजिंठालेणीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे. जगप्रसिद्ध अजिंठालेणी परिसरात जुन-जुलै महिन्यात वरुणराजाने आपली कृपादृष्टी दाखवली आहे. जुन महिन्यात झालेल्या जोरदार पावसानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अजिंठालेणी परिसरात  बरसणाऱ्या रिमझिम पावसाच्या सरींनी अजिंठालेणीला तिचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करून दिले असून अजिंठालेणीचे मोहक रुप आता पर्यटकांना खुणावत आहे


मागील काही दिवसांपासून अजिंठालेणी परिसरात अधूनमधून दररोज पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत. पावसाच्या सरींनी अजिंठालेणी गतवैभव प्राप्त झाले आहे. लेणीचे मुख्य आकर्षण असलेला वाघूर नदीवरील सप्तकुंड धबधबाही धो-धो कोसळत आहे. ढगाळ वातावरण अचानक अवतरणारे धुके, सरसर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, डोंगरातून ठिकठिकाणी फेसाळत क्षणभर कोसळून लुप्त होणारे छोटे छोटे धबधबे, पक्ष्यांचा किलबिलाट, मधूनच कानी पडणारा मोरांचा मंजुळ कर्णमधुर स्वर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून सोडत आहे.


निसर्गाने अजिंठालेणीवर मुक्त हस्ते केलेली नैसर्गिक सौंदर्याची उधळण बघून पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटुन जात आहे. फर्दापूर टि.पॉइंट येथे येताच येथील निसर्ग सौंदर्य बघून पर्यटक आपले भान हरखून जात आहे.निसर्ग सोंदर्याची हि उधळण बघून भारावलेले अनेक पर्यटक टि.पॉइंट ते अजिंठालेणी हे चार किमी चे अंतर पायीच प्रवास करुन लेणी गाठत आहे. या पायी प्रवासादरम्यान अजिंठा राखीव जंगलातील मोर, हरीण, ससे, रानडुक्कर या सारख्या वण्यप्राण्यांचे अचानक घडलेले दर्शन पर्यटकांना एक वेगळीच अनुभूती मिळवून देत आहे.AM News Developed by Kalavati Technologies