नवी दिल्ली । कृषी विधेयकावरून शेतकऱ्याचं आंदोलन सुरूच असतांना आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. ही बैठक कृषी विधेयकावर नसून देशात मोफत वाय-फाय सुरू करण्यावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी देण्यात आली असून, त्यातंर्गत देशात 1 कोटी डेटा सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्य़ात आली. या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस’असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता देशात प्रत्येक ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा मिळणार असून, देशात वायफाय क्रांतीच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आजच्य़ा कॅबिनेट बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि संतोष गंगवार आदी मंत्र्यांची उपस्थिती होती. या योजनेअंतर्गत देशात पब्लिक डेटा ऑफिस उघडण्यात येणार आहेत. त्यासाठी लायसन्सची गरज पडणार नाही. कोणत्याही दुकानाचं डाटा ऑफिसमध्ये रुपांतर करता येऊ शकतं. सरकारकडून डाटा ऑफिस, डाटा अॅग्रिगेटर आणि अॅप सिस्टिम उघडण्यासाठी 7 दिवसात सेंटर उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे.