बैलचलित सौरउर्जा फवारणी यंत्र शेतकर्‍यांसाठी वरदान

परभणीच्या पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाने केले विकसीत

परभणी । पावसाळा सुरू झाल्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. पीके आता वाढीच्या अवस्थेत असल्याने फवारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा स्थितीत बैलचलित सौर ऊर्जा फवारणी यंत्र शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणारे असून औषधी फवारणीच्या इंधनाचा खर्च कमी होऊन एकाच मजुरांद्वारे ही फवारणी करणे शक्य झाले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अखिल भारतीय समन्वयी संशोधन प्रकल्प असलेल्या पशुशक्तीचा योग्य वापर या विभागाने हे बैलचलित फवारणी यंत्र विकसीत केले आहे.

मनुष्यचलित फवारणी यंत्राच्या सहाय्याने फवारणी करते वेळी फवारा हा माणसाच्या जवळ असतो. त्यामुळे फवारणार्‍याच्या शरिरास फवार्‍यातून पडणारे किटकनाशक व तणनाशक हानीकारक ठरते. ही प्रक्रिया काही वेळेस मानुष्याच्या जीवावरही बेतते. त्यामुळे हा दोष टाळण्यासाठी बैलचलित सौरऊर्जा फवारणी यंत्र अत्यंत उपयुक्त आहे. या यंत्रास पेट्रोल, डिझेल व इतर इंधनाची गरज पडत नाही. सौरचलित असल्यामुळे पर्यावरणास पुरक आहे.

तसेच मनुष्याच्या शरिरावर पडणारा ताण कमी होण्यासही मदत होते. त्यादृष्टीने पशुशक्तीचा योग्य वापर योजनेने विकसीत केलेले हे यंत्र मानवचलित फवारणी यंत्रापेक्षा दहा ते बारा पटीने कमी खर्च करणारे आहे. मनुष्यचलित पाठीवरील फवारणीयंत्र पॉवरस्प्रे वापरते वेळी चालकास औषध फवारणीच्या इंधनाचा होणारा त्रास यामुळे होत नाही. सौरऊर्जेच्या सहाय्याने चालणाऱ्या यंत्रामध्ये सहामिटर रुंदीच्या बूमवर बारा नोझल बसविलेले असून टाकीची क्षमता 200 लिटर इतकी आहे.

वैशिष्ट व फायदे

1. जमिनीपासून फवारणीची उंची 60 सेंटिमिटर पासून 120 सेंटिमीटर करता येते.
2. फवारणी यंत्राची क्षमता 8.2 ते 9.5 लिटर प्रतिमिनिट
3. सर्वपीकांसाठी तणनाशक व किटकनाशक फवारणीकरिता उपयुक्त
4. इंधन व ऊर्जेची गरज नसल्यामूळे प्रदुषणरहित फवारणी करता येते.
5. पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये 50 टक्के बचत होते.
6. हे यंत्र फवारणी, अतिरिक्त पाणी उपसणे व वीजेवर चालणारी उपकरणे देखील चालविण्यास वापरता येते.AM News Developed by Kalavati Technologies