सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करताना सावधान! क्षणात रिकामं होईल बँक खातं

Juice Jacking । असं तंत्रज्ञान ज्यामुळे केवळ अनोळखी ठिकाणी चार्जिंग केल्यानेही बँक खातं रिकामं होऊ शकतंं!

टेक डेस्क । आजकाल मोबाइलशिवाय कुणाचेच भागत नाही. पूर्वी फक्त बोलण्यासाठी असणारा फोन आज दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आतातर इवल्याशा स्मार्टफोनमध्ये अख्खे विश्वच सामावले आहे. असा अत्यंत मूलभूत गरज असलेला फोन अचानक डिस्चार्ज झाल्यावर आभाळ कोसळल्यागत अनेकांचे भाव असतात. फोनची बॅटरी संपली म्हणत अनेक जण कपाळ धरून बसतात आणि लागलीच कुठे चार्जिंगची सोय होते का, हे पाहायला लागतात. पण सावधान! सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करत असाल तर तुम्हाला सजग करणारी माहिती येथे देत आहोत.

सार्वजनिक ठिकाणे उदा. विमानतळ, ट्रेन किंवा हॉटेलमध्ये आपला मोबाइल चार्ज करण्यापूर्वी आपण सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, कारण तुमच्या मोबाइलमधील सर्व डेटा हॅकर्सच्या ताब्यात जाऊन तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण खरोखरच असे तंत्रज्ञान अस्तित्वात आहे. त्याला ज्यूस जॅकिंग असे म्हणतात.

काय आहे ज्यूस जॅकिंग?
ज्यूस जॅकिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे जो चार्जिंग पोर्टद्वारे केला जातो. हे चार्जिंग पोर्ट यूएसबीद्वारे डेटा कनेक्शन म्हणूनदेखील वापरले जाते. याद्वारे फोनमध्ये मालवेअर टाकून फोनमालकाचा सर्व डेटा कॉपी केला जातो. मग होतं काय, तुम्हाला अचानक खात्यातून अमुक-अमुक रक्कम काढल्याचा मेसेज येतो. म्हणजेच तुमचे पैसे हॅकरने लंपास केलेले असतात.

कसे काम करते ज्यूस जॅकिंग?
ज्यूस जॅकिंगमध्ये सार्वजनिक यूएसबी पोर्टच्या माध्यमातून तुमच्या मोबाइलचा डेटा मिळवता येतो. मोबाइल यूएसबी पोर्टला कनेक्ट केला की, त्यात मालवेअर इन्स्टॉल केलं जातं. हेच मालवेअर हॅकरला तुमची माहिती पुरवत असतं. ही माहिती म्हणजे तुमचे पेमेंट आयडी, बँक ट्रान्झॅक्शन्स, काँटॅक्ट‌्स, मेसेजेस आणखीही बरंच काही...
या सायबर अटॅकचे परिणाम भयंकर असू शकतात. कारण फुकटात मिळत असलेलं एक बॅटरी चार्जिंग पॉइंट तुमचं अख्खं बॅंक खातं रिकामं करू शकतं. पासपोर्ट किंवा घरचा पत्ता यांसारख्या संवेदनशील माहितीची चोरी करू शकतात. यामुळे मोबाईल हँग होतो अथवा संथ काम करतो.

याबाबत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना चार्जिंग स्टेशनवर फोन चार्जिंग करण्याविषयी गत महिन्यातच एक इशारा दिला होता.


ज्यूस जॅकिंग टाळण्यासाठी काय करावं?
1. चार्जिंग स्टेशनच्या मागे विद्युत सॉकेट पाहा.
२. आपली चार्जिंग केबल स्वत:कडे ठेवा.
3. केवळ इलेक्ट्रिकल आउटलेटमधूनच चार्जिंग करा.
4. एखादी ब्रँडेड कंपनीची पॉवर बँकदेखील वापरू शकता, जेणेकरून ऐन प्रवासात इतरत्र चार्जिंग करण्याची वेळ येणार नाही.
5. स्वत:च्या खात्यावरून एखादा संशयास्पद व्यवहार झाल्यास आपल्या बँकेला त्वरित कळवा.
6. एखादं उत्तम दर्जाचं अँटी व्हायरस मोबाइलमध्ये इन्स्टॉल करा.AM News Developed by Kalavati Technologies