IND vs NZ वर्ल्डकप सेमीफायनल LIVE : सामन्याचा आजचा खेळ स्थगित झाल्याची पंचांची घोषणा, उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता उर्वरित खेळ होणार

टीम इंडिया हा सामना जिंकून चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल.

स्पोर्टस डेस्क । वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये मंगळवारी भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोघी संघ झुंजत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने 45 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या आहेत. टॉम लॅथम (1 ) व रॉस टेलर (60) क्रीझवर आहेत. दरम्यान मध्येच पावसाचे आगमन झाल्यामुळे खेळ बंद आहे. मँचेस्टरवर पाऊस अद्याप सुरुच, सुपर सोपर्स मशिनने आऊटफिल्ड कोरडी करण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. 

सामन्याचा आजचा खेळ स्थगित झाल्याची पंचांची घोषणा, उद्या सकाळी 10.30 वा. (भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वा.) उर्वरित खेळ होणार 

अशी झाली किवींची पडझड

- भुवनेश्वर कुमारने भारताला मिळवून दिलं पाचवं यश, ग्रँडहोम(16) बाद; धोनीने टिपला झेल

- भारताला चौथं यश; पंड्याने धाडले निशमला माघारी 

- भारताला मोठं यश, चहलने कर्णधार केन विल्यमसनला 67 धावांवर धाडलं माघारी 

- भारतीय संघाला दुसरं यश, रवींद्र जडेजाने सलामीवीर हेन्री निकोल्सला केलं त्रिफळाचीत.

- मार्टिन गुप्तिलच्या रूपाने किवींना पहिला झटका बसला. बुमराहच्या चेंडूवर विराटने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

दरम्यान, दानावरील आकाशात ढगांनी गर्दी केलेली आहे. थांबून-थांबून पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, न्यूझीलंडची टीम सलग दुसरा वर्ल्डकप फायनल खेळण्यासाठी आतुर आहे. गत वेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध किताबी सामन्यात किवींचा पराभव झाला होता.

न्यूझीलंडचा पराभव करणे भारतासाठी सोपे नाही. टीम इंडियाने मागच्या 4 वर्षांत त्यांच्याविरुद्ध 5 एकदिवसीय सामने जिंकलेले आहेत. दोन्ही संघादरम्यान 2015 विश्वचषकानंतर 13 सामने झाले. यापैकी टीम इंडियाने 9 मध्ये विजय मिळवला. तर किवींना फक्त 4 सामन्यांतच यश मिळाले. मँचेस्टरमध्ये दोन्ही संघ 44 वर्षांनंतर आमनेसामने येतील. 1975च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने भारताला 4 गडी राखून पराभूत केले होते. यानंतर इंग्लंडच्या मैदानावर दोन्ही संघांदरम्यान आणखी दोन वन डे सामने झाले. दोन्ही सामन्यांत न्यूझीलंडचा संघ यशस्वी राहिला. 1999 मध्ये नॉटिंघममध्ये भारत 5 विकेट आणि 1979 मध्ये 8 विकेट्सनी पराभूत झाला होता.

मँचेस्टरचे हवामान
मँचेस्टरमध्ये पावसाची शक्यता आहे. दिवसभरात आकाश ढगाळलेले राहील. तापमान 18 ते 20 डिग्री सेल्सियसच्या जवळपास राहण्याचा अंदाज आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल. भारताने या मैदानावर पाकिस्तानला पराभूत केले होते. येथे धावांचा पाठलाग करणारे संघ मागच्या 5 सामन्यांत पराभूत झालेले आहेत.

असा आहे भारताचा संघ
विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, कुलदीप यादव.

असा आहे किवींचा संघ
केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्तिल, मॅट हेन्री, टॉम लाथम, कॉलिन मुन्रो, जेम्स निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटनर, ईश सोढी, टिम साउदी.AM News Developed by Kalavati Technologies