स्पोर्ट्स डेस्क | जगातील सर्वात यशस्वी यष्टिरक्षक, फलंदाज अशी ख्याती असलेल्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा आज वाढदिवस. आज (7 जुलै) धोनीने वयाची 38 वर्षे पूर्ण केली आहेत. झारखंडच्या रांचीचा रहिवासी असलेल्या या अवलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्याने भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्पर्धांत जेतेपद पटकावून दिले आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये धोनी आज सर्वोच्च स्थानी आहे.
आनंदासह निराशा का?
सर्वांचा लाडका माहीचा वाढदिवस म्हटल्यावर चाहते आनंदी असणारच; मात्र यंदाच्या विश्वचषकानंतर धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चेमुळे चाहते मात्र भावनिक व निराश झाल्याचे दिसून येत आहे. आपला लाडका कर्णधार मैदानापासून दूर जाणार या विचाराने चाहत्यांच्या आनंदावर विरजण घातले आहे. परंतु धोनीने निवृत्तीबद्दलच्या सर्व चर्चांना उत्तर दिले आहे. धोनी म्हणाला, काही जणांना मी 2011च्या विश्वचषकानंतर निवृत्त होण्याची घाई झाली होती. मी कधी निवृत्त होईल, हे मलाही माहिती नाही. धोनीला त्याच्या खराब फॉर्ममुळे बऱ्याचदा टीकेचा सामनाही करावा लागला. परंतु मैदानावर आपल्या यष्टीमागच्या कामगिरीने आणि तडाखेबंद फलंदाजीने धोनीने वेळोवेळी आपल्या कूल अंदाजातच टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.
सर्व फॉर्मेटमध्ये मिळवले जेतेपद
क्रिकेटच्या इतिहासात सर्व फॉर्मेटमध्ये जेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनी एकमेव कर्णधार आहे. त्याने 2007 मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावून दिले आहे.
सर्वाधिक यशस्वी कर्णधार
धोनीने 332 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. जगात सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करण्याचा हा विक्रम आहे. धोनीनंतर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाकडून 324 सामन्यांत संघाची धुरा सांभाळली आहे. तसेच भारताचा कर्णधार म्हणून धोनीने सर्वाधिक सामन्यांत विजय मिळवून दिलेला आहे.
यष्टीमागचा विक्रम
धोनीने आतापर्यंत 349 सामन्यांत यष्टिरक्षण केले आहे. त्यात त्याने 122 खेळाडूंनी यष्टिचीत करत तंबूत पाठवले. तसेच विकेटकीपर म्हणून त्याने 312 झेल घेतले आहे. ही कामगिरी करणारा धोनी जगात एकमेव खेळाडू आहे.
यष्टिरक्षणासह दमदार फलंदाजी
महेंद्रसिंह धोनी यशस्वी यष्टिरक्षकासह दमदार फलंदाजही आहे. वनडे व कसोटी सामन्यांत विकेटकीपर म्हणून सर्वोच्च धावा करण्याचा विक्रमही धोनीच्या नावे आहे. धोनीने वनडेत श्रीलंकेविरोधात 183, तर कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 224 धावांची दमदार खेळी केली आहे.