कोरोनाचे कारण देत बलात्कार पीडित मुलीची तपासणी करण्यास डॉक्टरांचा नकार, इंदापूर येथील घटना

डाॅ.शिरिश साळुंखे यांचे विरोधात सहाय्यक पोलिस निरिक्षकाची वरिष्ठांकडे तक्रार

इंदापूर(देवा राखुंडे) इंदापूर तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवुन फुस लावुन पळवुन नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत इंदापूर पोलीसात दि.१४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून दि.२२ जून रोजी या प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र माणूसकिला काळींमा फासणारी घटना पुन्हा एकदा इंदापूर उपजिल्हा रूग्णालयातील मुर्दाड डाँक्टर कडून घडल्याने पीडित मुलीच्या कुटूंबाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर या मुर्दाड डॉक्टर विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरिक्षक गणेश लोकरे यांनी थेट पुणे येथील वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी कार्यालयाकडे दि.२६ जून रोजी आपली तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रविवार दि.१४ जून २०२० रोजी तरंगवाडी ता.इंदापूर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातील २३ वर्षीय मुलाने लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवुन नेले. यानंतर पिडीत मुलीच्या वडीलांनी इंदापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपीस सोमवार दि.२२ रोजी इंदापूर पोलीसांनी अटक केली. पीडीत मुलीची त्याचे ताब्यातुन सुटका देखील करण्यात आली. त्यानंतर पोलीस कसून केलेल्या चौकशीत मुलीला लग्नाचे अमीष दाखवुन तिच्यावर वेळोवेळी शारीरीक संभोग केल्याचे निष्पन्न झाले. बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करूण्यात आला. सदर पिडीत अल्पवयीन मुलीस इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दि.२५ जून रोजी वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आली. यावेळी त्या मुली सोबत महिला पोलीस कर्मचारी सुद्धा हजर होत्या.

मात्र यावेळी रूग्णालयाचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिरीश साळुंखे यांनी अल्पवयीन पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यास कोरोनाचे कारण देत टाळाटाळ केली. शिवाय महिला पोलीसांना अरेरावीची भाषा वापरून हुज्जत देखील घातली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे हे रूग्णालयात दाखल झाले. त्यांनी डॉ. शिरीष साळुंखे यांकडे विनंती केली की सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याचे पुराव्याचे दृष्टीने पीडीत मुलीची तपासणी होणे आवश्यक आहे. या अगोदर बरेच जबरी संभोग वैद्यकीय तपासणी आपलेकडे पुरूष डॉक्टर यांनीच केली आहे. त्याबाबत आपल्याला काय अडचण आहे असे पोलीसांनी विचारताच डॉ. साळुखे यांनी बाकीचे डॉक्टर शहाणे आहेत, मी तेवढा शहाणा नाही असे म्हणत ती मुलगी तीचे बॉय फ्रेंडबरोबर कोठे कोठे जाऊन फिरून आली असेल त्यामुळे मी या मुलीची वैद्यकीय चाचणी करु शकत नाही असे उत्तर दिले. तसेच तुम्ही काँस्टेबल आहात मी एक मेडिकल ऑफिसर आहे. तुम्ही मला शिकवु नका असे अपमानास्पद बोलुन महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी उर्मटपणे हुज्जत घातली.

मी इथे पीडितेची तपासणी करू शकत नाही. इथे स्त्री रोग तज्ञ नाही. तुम्ही या मुलीला बारामती येथे घेवुन जा. असे सांगुन सदरील मुलीला वैद्यकीय अधिकाऱ्याने स्त्री रुग्णांलय बारामती येथे रेफर केले. मुलीचे वडील डॉक्टरांचा हा सर्व प्रताप डोळ्यादेखत पाहत होते. आपल्या मुलीची अशी निघनारी धिंड पाहून डोळ्यातून अश्रू गाळण्याशिवाय त्याकडे काहीच नव्हते. वैद्यकीय अधिकारी डॉ.साळुंखे यांनी बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २७ अन्वये पिडीत मुलीची जबरी संभोगाबाबत वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असताना कर्तव्य टाळुन एका अल्पवयीन पिडीत मुलीची हेळसांड केल्याचे तक्रारीत म्हटले असुन याबाबतची तक्रार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी पूणे येथील वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी कार्यालयाकडे केली असुन इंदापूर उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनाही तक्रारीची प्रत पाठविल्याचे सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षकांनी डॉ.साळुखे यांना बजावली कारणे दाखवा नोटीस.

कर्तव्यावर असताना बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यास नकार देवून कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे तात्कालीन कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष साळुखे यांचे पोलीसांशी गैर वर्तन व अरेरावी याबाबतची तक्रार इंदापूर पोलीसांकडून रूग्णांलयास प्राप्त झाल्या नंतर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदणशीवे यांनी सदर बेजबाबदार डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.AM News Developed by Kalavati Technologies