कोल्हापूरात गुटख्याच्या बॅगा चोरल्याच्या संशयातून एकाचा खून ; दोघे गंभीर

अर्जुन याचा मारहाणीत मृत्यू झाल्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय या दहा जणांनी घेतला. मात्र तत्पूर्वीच या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलासंनी सर्वत्र नाकाबंदी केली.

कोल्हापूर ।  गुटख्याच्या बॅगा चोरल्याच्या संशयातून अमानुष मारहाण केल्याने मृत्यू झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना ताब्यात घेतले असून, यातील सहभागी अन्य चौघा जणांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेत दानोळी (ता. शिरोळ) येथील अर्जुन नामक तरुणाचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.

टुमकूर ते अथणी या मार्गावर गुटख्याची वाहतूक आयशर कंटेनरमधून करण्यात येत होती. दरम्यान, हा गुटख्याचा कंटेनर अथणीकडे येत असताना कंटेनरमध्ये असलेल्या 144 बॅगांपैकी 53 बॅगांची चोरी झाल्याचे उघडकीस आले. ही चोरी या कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक करणाऱया चांदपाशा सनाऊल्लाह व नरसिंह मूर्ती (वय 28, रा. बसवाण्णा आळी, ता. निलमंगळा, बेंगळूर) व त्यांचा मित्र अर्जुन (पूर्ण नाव समजू शकले नाही) या तिघांनी चोरल्याचा संशय इमरान अल्ताफपाशा (वय 32, रा. चिकबाणावर, बेंगळूर), अश्रफअली उस्मानअली (वय 38, सतरंजीपुरा, नागपूर) व साजिद पठाणी (मूळ रा. मुंबई, सध्या रा. अप्सरा हॉटेलजवळ, मिरज) यांना आला. त्यामुळे या गुटख्याच्या बॅगांची चौकशी करण्यासाठी तिघांनाही अथणी येथील एका गोडावूनमध्ये आणण्यात आले. त्याठिकाणी या तिघांनाही अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर इनोव्हा गाडीत घालून त्यांना मिरज येथे आणण्यात आले. तेथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेऊन पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. व गुटख्यांच्या बॅगांबद्दल चौकशी केली. पण तिघा जणांकडून त्याबद्दल सांगण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या इमरान अल्ताफपाशा आश्रफअली व साजिद पाठनी यांनी नृरसिंहमूर्ती, चांदपाशा सनाउल्लाह व अर्जुन यांना शिरोळ येथील फार्म हाऊसवर आणण्यात आले. त्याठिकाणी त्यांना पुन्हा बेदम मारहाण करून बॅगा चोरीची कबुली देण्यासाठी दबाव आणला. यावेळी या मारहाणीत संशायित महेश बजरंग दळवी (रा. दानोळी), अभिनंदन उर्फ अभ्या राजकुमार धडेल (रा. कोथळी), भरतेश सिद्राम कुडचे (रा. नदीवेश, मिरज), महंमद जुनेद अब्दुलगफार दिवाण (रा. शांतीनगर, इगतपुरी, नागपूर) व रणजित प्रकाश मिसाळ (रा. नदीवेश, मिरज) यांनीही त्यांना मारहाण केली. ही घटना सोमवार 21 रोजी घडली. या मारहाणीत अर्जुन याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, अर्जुन याचा मारहाणीत मृत्यू झाल्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय या दहा जणांनी घेतला. मात्र तत्पूर्वीच या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलासंनी सर्वत्र नाकाबंदी केली.



AM News Developed by Kalavati Technologies