पुणे | गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. दरम्यान नुकतेच या गावांमधील पाणी ओसरायला लागले आहे. मात्र या संकटातून सावरणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्यात वेधशाळेनं पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातल्या घाट क्षेत्रामध्ये 13 आणि 14 ऑगस्टला मुसळधार पाऊस होणार असळ्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. यामुळे आता येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. गावातील नद्या कोपल्या आणि पूराने अनेकांचे संसार वाहून नेले. दरम्यान नुकतीच पावसाने उसंत घेतली आणि येथील पूर हळुहळू ओसरु लागला आहे. तोच आज आणि उद्या पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता नागरिकांची चिंता वाढणार आहे. दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. तर कोकणातल्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये 13 आणि 14ला तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.