'राज गर्जने'आधी पुण्यात पावसाची जोरदार बॅटींग, पहिलीच सभा रद्द

पावसामुळे व्यासपीठ आणि बैठक व्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्यामुळे अखेर मनसेला ही सभा रद्द करावी लागली

पुणे । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पुण्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभा रद्द करण्यात आली आहे. पुण्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नियोजित सभा अद्याप सुरु होऊ शकलेली नाही. पावसाचा जोर पाहता ही सभा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मनसे पदाधिकारी सभा होणारच या भूमिकेवर ठाम होते. मात्र पावसामुळे व्यासपीठ आणि बैठक व्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्यामुळे अखेर मनसेला ही सभा रद्द करावी लागली आहे.

बऱ्याच दिवसांपासून शांत असलेले राज ठाकरे आज काय बोलणार ? त्यांच्या निशाण्यावर कोण असणार? भाजप-शिवसेनेची कुठली प्रकरणे ते बाहेर काढणार? याबद्दल राजकीय तज्ञांपासून सर्वांनाच उत्सुक्ता होती. मध्यंतरी राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर राज ठाकरे शांत झाले होते. एरवी राज ठाकरे सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. पण तिथे सुद्धा त्यांनी काहीही भाष्य केले नाही. त्यामुळे मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. नेते आणि कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. अखेर राज ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

यानंतर सुरू झालेल्या प्रचाराच्या रणधुमाळीत मनसे अजुन उतरली नव्हती. राज यांच्या पुण्यातील सभेने मनसेच्या प्रचाराचा श्रीगणेशा होणार होता. मात्र पहील्याच सभेत पावसाचे वितुष्ट आल्याने मनसैनिकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. AM News Developed by Kalavati Technologies