उजनी धरणातून चंद्रभागा नदीपात्रात 1 लाख 85 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पंढरपूर गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पुर आले आहे

पंढरपूर । उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने उजनी धरणातून 1 लाख 85 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. तर यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वीर धरणाच्या वरील तिन्ही धरणात पुरेसा पाणीसाठा असून वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग सतत वाढत आहे. धरण क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून, त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीर धरणातून 32 हजार पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. आज पहाटे हे पाणी सोलापूर जिल्ह्यात भीमेच्या पात्रात दाखल झाले असून, भीमा नदी या पावसाळ्यात पहिल्यादाच दुथडी भरून वाहत आहे.

पंढरपूरकडे येणारे सातारा, पुणे, सोलापूर, मंगळवेढा या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. दरम्यान, चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा विसर्ग पाहता दुपारपर्यंत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. व्यास नारायण, अंबाबाई पटांगण, लखुबाई, आंबेडकर नगर झोपडपट्टी आदी भागातील जवळपास 500 कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी अजून 300 असे एकूण 800 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

उजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागात दुपारपर्यंत पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जीव रक्षक, एनडीआरएफची टीमला तैनात केले आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशार दिला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर ते सातारा, पुणे, सोलापूर, मंगळवेढा या ठिकाणी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु केली आहे.

चंद्रभागा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. चंद्रभागा नदी पात्रामधील पुंडलिक मंदिरांसह इतर मंदिरे, समाधीस्थळे देखील पाण्याखाली गेले आहेत. जुना दगडी पूल ही पाण्याखाली गेला आहे. तर नदीपात्रातील परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकंदरीत एकीकडे कोरोनाचे संकट असताना आता दुसरीकडे पुराचा फटका तालुक्याला बसला आहे. तर या अतिवृष्टीचा फटका बळीराजाला देखील बसला आहे.AM News Developed by Kalavati Technologies