कोरोनाची शेतकऱ्यांच्या बांधावर धडक, तोंडाला आलेला घास मातीत

बाजारपेठा खुल्या झाल्या नाहीत तर आत्महत्या हा एकच मार्ग असल्याचे शेतकरी सांगत आहेत

पंढरपूर | कोरोनाचा नागरिकांच्या आरोग्यावर हल्ला वाढत आहे. यातुन बचावासाठी साऱ्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र दुसरीकडे देशाचा आर्थिक कणा असलेला शेतकरी मोठ्या अडचणीत आलाय. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा माल तयार झालाय. मात्र तो विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतमाल जागेवरच सोडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार गावातील द्राक्ष उत्पादक शेतकरी शिवाजी हळणवर. यांची दहा एकर द्राक्ष बाग आहे. सलग आलेले चार दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिठी मधून यांनी आपली बाग जगवली. पोटच्या लेकराप्रमाणे वाढवली. सलग 140 दिवस अनेक आस्मानी संकटांशी लढा देत आज पीक हाताला आले. चार वर्षाच्या दुष्काळाची देणी जावून चार पैसे घरात राहतील असा विश्वास वाढला. उन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता पूर्ण कुटुंबाने कष्ट घेतले अन शिवार द्राक्षांनी फुलून गेले.

माल परदेशी पाठवण्यासाठी व्यापाऱ्यांशी सौदा झाला दर ठरले. माल तोडणीला सुरवात करायची तर व्यापाऱ्याने मेसेज पाठवला. परदेशातील बाजारपेठांचे दरवाजे बंद झालेत. यामुळ तोंडाला आलेला घास मातीत जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय. द्राक्ष घडाचे मणी गळून पडू लागलेत. माल विक्रीला बाजारात जावे तर ग्राहक नाही वरुन कोरोनाची भीती तर माल उतरवला नाही तर जागेवर सडुन जाण्याची भीती. कोरोनाने मोत्यासारख्या मालाची माती केल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. पुढील सात ते आठ दिवसात बाजारपेठा खुल्या झाल्या नाहीत तर आत्महत्या हा एकच मार्ग असल्याचे शेतकरी सांगत आहे.AM News Developed by Kalavati Technologies