कॉंग्रेस गांधी-नेहरूंच्या विचारांवर तर मोदी शिवरायांच्या विचारांवर चालतात - एकनाथ खडसे

पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तर गृहमंत्री अमित शहांची तानाजी यांच्या रुपात असलेला व्हिडिओ सध्या वायरल झाला आहे

सोलापूर । कॉंग्रेस ज्याप्रमाणे गांधी नेहरुंच्या विचाराने चालते त्याप्रमाणे देशाचे प्रधानमंत्री हे छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालताहेत. महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे चुकीचे नाही. मात्र तुलना करणे चुकीचे आहे. छत्रपती शिवरायांशी कोणाचीही तुलना होवू शकत नाही. असा घरचा आहेर भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला दिलाय. पंढरपूरमध्ये ते विठ्ठल दर्शनाला होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या राज्यात छत्रपती शिवरायांच्या तुलनेवरुन राजकारण सुरु आहे. यामध्येच दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीसाठी पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तर गृहमंत्री अमित शहांची तानाजी यांच्या रुपात असलेला व्हिडिओ सध्या वायरल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंनी केलेल्या या विधानाला महत्व प्राप्त झालय.

महाविकासआघाडी हे तीन पायाचे सरकार आहे. गेल्या पन्नास दिवसात महाविकासआघाडीचे पन्नास वैचारिक मतभेद समोर आलेत. मात्र पुरोगामी कॉंग्रेस, राष्ट्रवादीने कट्टर हिंदूत्ववादी सेनेशी आघाडी केलीय. सत्तेसाठी हे तीनही पक्ष आपली विचारधारा विसरलेत. त्यामुळे हे सरकार किती काळ टीकणार हे येणारा काळच ठरवेल असे खडसे म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies