...म्हणून कोथरूडमध्ये राष्ट्रवादीनं मनसेला पाठिंबा दिला, राज ठाकरेंसोबत एकत्र सभेबाबत अजित पवार सकारात्मक

"आता दहा रुपयांत जेवण आणि कर्जमाफीच्या घोषणा करताय, शिवसेना पाच वर्षे झोपली होती का?" - अजित पवार

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोथरूडमध्ये मनसे उमेदवाराला पाठिंबा का दिला, यामागचे कारण स्पष्ट केले आहे. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, ``आमची काँग्रेसशी आघाडी आहे. भाजप-सेनेविरोधात मतविभाजनाचा फटका बसू नये, म्हणून अनेक ठिकाणी वेगळी भूमिका घेतली आहे. कोथरूडची जागा त्यापैकीच एक आहे. तिथे मनसेला पाठिंबा दिलाय. आजच्या सभेत राज ठाकरे काय आवाहन करतात ते पाहू. गरज भासली तर एकत्रित सभा घेता येतील का यावरही विचार करू." एकूणच अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यासोबत एकत्रित सभा घेण्यास तयारी दाखवली आहे. राज ठाकरे हे आजच्या सभेत काय आवाहन करतात आणि वेळेच नियोजन कसं ठरतं यावर विचार करू, असेही अजित पवार म्हणाले

दुसरीकडे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केले. पवार म्हणाले, "माझे अश्रू हे कशाचे आहेत हे पाहण्यापेक्षा युती कशी टिकेल, हे उद्धव ठाकरे यांनी पाहावं. शिवसेना पाच वर्षे झोपली होती का? आता दहा रुपयांत जेवण आणि कर्जमाफीच्या घोषणा करताय. मी कसा आहे, ते लोकांना माहिती आहे. माझे अश्रू मगरीचे आहेत की कशाचे हे तापासायचं काम उद्धव ठाकरे कधीपासून करायला लागले? हे सरकार शेतकरीविरोधी आहे. हे मी कायम सांगत आलोय. आता कांद्याला पैसे मिळायला लागले तर लगेच निर्यातबंदी केली, अशी टीकाही अजित पवारांनी केली.

राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, सरकारनं पाच वर्षांत काय केलं ते सांगाव? 370 कलम रद्द करण्याचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधित नाही. इथं बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांसारखे अनेक प्रश्न असताना यावर सत्ताधारी बोलत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. सुप्रिया सुळेंना डेंग्यू झाला होता म्हणून त्या सुरुवातीच्या टप्प्यात सक्रिय नव्हत्या. परंतु आता त्या प्रचारात सक्रिय होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांचं दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतचं मत वैयक्तिक असून ती त्यांची इच्छा आहे. ते काँग्रेस मोठे नेते आहेत; पण आता निवडणुकीला सामोरं जाताना कुठलाही संभ्रम नको. राष्ट्रवादीचं अस्तित्व वेगळं असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.AM News Developed by Kalavati Technologies