आर.आर. आबांच्या पत्नी सुमनताईंना आव्हान देणार या केंद्रीय मंत्र्याच्या पत्नी

सांगलीतील तासगाव मतदारसंघ हा आबांचा बालेकिल्ला आहे.

सांगली | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी तासगाव-कवठे महांकाळमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीमधून निधी खेचून आणू, अशी ग्वाही सुद्धा सीमा आठवले यांनी दिली आहे. तासगाव येथे आयोजित महिला मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले आहे. यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली तर त्या आबांच्या पत्नी सुमनताईंना टक्कर देऊ शकतात.

सांगलीतील तासगाव मतदारसंघ हा आबांचा बालेकिल्ला आहे. 2014 च्या निवडणुकीतही ते विजयी झाले होते. मात्र त्यांचे निधन झाले अन‌् पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनताई विजयी झाल्या. आताही राष्ट्रवादीकडून सुमनताईंची उमेदवारी निश्चित मानली जाते. आता सीमा आठवले यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आता त्या आबांच्या पत्नीला आव्हान देणार आहेत.

पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांशी बोलताना सीमा आठवले म्हणाल्या की, दुष्काळी भागातील शेतकरी, शेतमजुरांचे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात पूर्णत्वास नेण्यासाठी लक्ष घातले जाणार आहे. तसेच महिलांच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन महिला आघाडीने प्रयत्न केले पाहिजे असा सल्ला त्यांनी पक्षाच्यामहिला पदाधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी 2014 मध्ये सांगलीची खासदारकी मिळवली. आता त्यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघासाठी भाजपतर्फे तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान आठवलेंच्या पत्नी सीमा आठवले यांनीही याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता उमेदवारी नक्की कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies