जळगाव । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. आपण मागील 40 वर्षे पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले. पक्षानेही मला भरपूर दिले. पण अवघ्या चार दिवसांत माझी बदनामी केली गेली. मी काहीही केलेले नसताना माझ्यावर कारवाई करण्यात आली. खडसे कुठल्यातरी स्पर्धेत येईल त्यासाठीच माझी बदनामी करण्यात आली. मला आता निर्णय प्रक्रियेतूनही काढून टाकण्यात आले आहे. मला कोअर कमिटीतही स्थान नाही. आजही मला फक्त जळगावच्या बैठकीचे निमंत्रण होते. हा माझा अपमान आहे. मला टार्गेट केले जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. शेवटी मी माणूस आहे, देव नाही. मलाही भावना आहेत. जर असाच माझ्यावर अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना दिला. आज भाजपची जळगाव निहाय कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करताना एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
...तर मला वेगळा विचार करावा लागेल, एकनाथ खडसेंनी दिले बंडाचे संकेत
शेवटी मी माणूस आहे, देव नाही. मलाही भावना आहेत
