वीजबिलावरून नांदेडमध्ये भाजप आक्रमक, अर्धापुरात केली वीजबिलाची होळी

शेतकऱ्यांचे शेतीचे व घरगुती वापराचे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी वीजबिलाची होळी करून निवेदन देण्यात आले.

नांदेड (अर्धापूर । अजित गट्टाणी) । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनास पाठिंबा देत अर्धापूर तालुका भाजप पदाधिकारी यांनी वीजबिल माफ करावे, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे अर्धापूरचे तहसीलदार सुजित नरहरी यांच्यामार्फत दिले आहे.

तालुक्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने लॉकडाऊन व संचार बंदी केली. त्यामुळे सर्व उद्योग धंदे बंद होते, तसेच शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणी असल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे व घरगुती वापराचे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी वीजबिलाची होळी करून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना भाजपच्या वतीने शुक्रवारी निवेदन देण्यात आले.

वीज वितरण कंपनीच्या वतीने मार्च, एप्रिल व मे महिन्याचे घरगुती वापराचे विद्युत बिल अव्वाच्या सव्वा आल्याने जनता मात्र दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे आर्थिक अडचणीत सापडली आहे. कोरोना संसर्गामुळे सर्व छोटे-मोठे उद्योग धंदे बंद पडल्याने तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी व सामान्य जनता अडचणीत सापडली आहे. महाविकास आघाडी सरकारने हे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी वीजबिलाची होळी करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देत अर्धापूर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौकात प्रचंड घोषणाबाजी करत वीजबिलाची होळी करून तहसीलदार सुजित नरहरे व अभियंता नागेश खिल्लारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले. तसेच शेतीचे विद्युत वीजबिल माफ करावे, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. या वेळी भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies