BLOG : 'ती' जळतीये, आम्ही फक्त पाहतोय...

अत्याचार होतातच का? अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याइतपत माणसाची हिंमत कशी होते?

महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी अधिकाधिक वाढत आहेत. महिलेला एक वस्तू समजत जाळले जातेय.. आणि तुमच्या-आमच्यासारखे लोक फक्त पाहताहेत. सोशल मीडियाद्वारे पोस्ट, कॅन्डल मार्च, निषेध यामधून भावना व्यक्त केल्या जातात. परंतू केवळ हा दिखावा आहे की काय प्रश्न अत्याचाराच्या घटनांमधून उपस्थित होतोय. एकीकडे निर्भयाला गेल्या 7 वर्षांपासून न्याय मिळत नाहीये. आरोपींना फाशी होऊन बराच काळ लोटलाय. पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये. ही एक मोठी शोकांतिका आहे. दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हिंगणघाटची घटना असो औरंगाबादेतील. या केवळ निमित्त आहेत अत्याचाराच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी. यासारख्या प्रकरणावरून पुरुषी मानसिकता कोणत्या दिशेला जात आहे यावर खरंच विचार करण्याची वेळ आलीय. आज मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असा संदेश घराघरात दिला जातोय. परंतु त्या मुलीला, स्त्रीला माणसासारखे वागावे, तिला एक माणूस म्हणून गृहित धरावे ही सांगण्याची आज वेळ आलीय. महिलांवरील अत्याचाराच्या घटना पूर्वीपासून सुरूच आहेत. निर्भया असो वा हिंगणघाटची शिक्षिका.. यांच्यामुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आलेय. याविरोधात आपण आता आवाज उठवू. त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नही करूत. कायद्यानूसार त्या नराधमांना योग्य शिक्षा होईलही. पण हा मु्द्दा इथेच संपणार नाहीये. खरा प्रश्न हा आहे की, महिलांवर अत्याचार होतातच का? अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याइतपत माणसाची हिंमत कशी होते? सुंदर असणे, पुरुषापेक्षा कमजोर असणे हा स्त्रिचा दोष आहे का? असे असंख्य प्रश्न आज स्त्रियांसमोर निर्माण झालेत. आज मोठ्या दु:खाने मला सांगावे लागतेय, एक मुलगी म्हणून आज मला समाजात वावरण्याची भीती वाटतेय. हे असे का होते याचे उत्तर तुम्हा सर्वांनाच माहितेय. मुलींना सन्मानाने वागणूक द्यावी, तिचा आदर करावा हेही तुम्हांला माहितेय.

पण यापुढे केवळ माहित असून चालणार नाही. ते वागणुकीतून दाखवून द्यावे लागेल. त्याचप्रमाणे मुलींनीही केवळ आपण मुलगी आहोत असं समजून कोणताही अन्याय सहन करू नये. प्रथमत मुलींनी व्यक्त होणेचं शिकायला हवे. स्व-सुरक्षा, स्वावलंबी, सक्षमीकरण यातर खूप पुढच्या गोष्टी आहेत. अगोदर व्यक्त तर व्हा. मला भीती वाटली, पण ती मी व्यक्त तर केली. उद्या कदाचित मला अपमानजनक, हिसंक परिस्थितीचा सामना करावा लागला तरी मी निश्चित व्यक्त होईल. मनातल्या मनात कुढत बसणार नाही की रडत बसणार नाही. बाळाला रडल्याशिवाय आई दूधही पाजत नाही, हे वास्तव आहे. म्हणून मला वाटते की, आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण स्वत:हून आवाज उठवला पाहिजे. महिलांवरील अत्याचार रोखण्याचा हा सर्वात पहिला उपाय आहे असे एक स्त्री म्हणून मला वाटते. अत्याचार रोखण्यासाठी कायदा नव्हे तर मानसिकता बदलायला हवी!

- अपूर्वा कुलकर्णीAM News Developed by Kalavati Technologies