इरफान... एका अभिनय युगाचा अस्त

इरफान खान यांचा थक्क करणारा प्रवास

डेस्क स्पेशल (अजय देशपांडे) आज अभिनेता इरफान खान यांनी मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांची ही अकाली एक्झिट बॉलिवूड, हॉलिवूडसोबतच त्याच्या चाहत्यांना चटका लावून गेली. खर तर इरफान यांच्यासारख्या चतुरस्त्र अभिनेत्याच्या मृत्यूने हिंदी चित्रपट श्रुष्टीचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय, पद्ममश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं.

इरफान खानला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. इरफान खान याचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं होतं, मात्र अभिनय क्षेत्रामध्ये ते इरफान खान या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानमधील जयपूरमध्ये झाला. अभिनयाची आवड असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं, मात्र त्यानंतर ते आपलं नशीब अजमवण्यासाठी मायानगरी मुंबईत आले होते. आणि याच मुंबईने त्यांना पुढे सुपरस्टार केलं.

 सुरुवातीच्या काळात इरफान खानच्या वाट्याला प्रचंड स्ट्रगल आलं. मात्र तरीही ते मागे हटले नाही, मिळेल ती भूमिका करत गेले, आणि त्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहील अशी स्वतःची अवीट छाप सोडून गेले, त्यांनी सुरुवातीला भारत एक खोज, चंद्रकांता, चाणक्य अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. त्याला मालिकांमधील अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडची कवाडं खुली झाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

त्याने 1988 साली राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सलाम बॉम्बे या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. आणि याच भूमिकेच्या जोरावर त्याला पुढे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. त्याने ‘मकबूल’, ‘रोग’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘स्‍लमडॉग मिलेनियर’, ‘पान सिंह तोमर’, ‘द लंचबॉक्‍स’ आणि लाइफ ऑफ पाय या सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पान सिंह तोमर या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देखील मिळाला.

मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. इरफान आपल्या अभिनय क्षेत्रातील सर्वोच्च बिंदूवर असताना, त्याला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने गाठलं. मागच्यावर्षी तो लंडनवरून उपचार घेऊन भारतात परतला होते. आता सगळं ठीक झालं आहे, पुन्हा एकदा इरफानची भूमिका असलेले चित्रपट पाहता येणार असं वाटत असतांनाच, आजार बळावला गेला आणि उपचार सुरू असताना इरफान खानने मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एक हरहुन्नरी अभिनेता आपल्यातून कायमचा निघून गेला.AM News Developed by Kalavati Technologies