रवीशच्या निमित्तानं

...पण हे कौतुक करताना माध्यमांतील एका प्रवाहाच्या दुटप्पीपणाचीही मला खंत वाटते

 रवीश कुमार यांना मॅगसेसे पुरस्कार जाहिर झाल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. आवाज नसलेल्यांचा आवाज म्हणून रवीशचं कौतुक केलं जातंय. हे कौतुक अत्यंत योग्य अन चपखल आहे. कारण ज्या घटनेची मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून दखल घेतली जात नाही, त्याची दखल घेणारे रवीश की रिपोर्ट त्यांनी मांडले आणि समस्यांना वाचा फोडली. अगदी झुग्गी बस्तीतल्या सांडपाणी व्यवस्थेचं वास्तवही त्यांनी रिपोर्टमधून मांडलं. छोट्यातल्या छोट्या समस्येला वाचा फोडून सामान्यांचा आवाज रवीश बनत राहिले. आणि म्हणूनच माझ्यासह सर्वांनाच रवीश यांचं कौतुक आहे. पण हे कौतुक करताना माध्यमांतील एका प्रवाहाच्या दुटप्पीपणाचीही मला खंत वाटते. कारण रवीशवर कौतुकाचा वर्षाव करणारे माध्यमांतील आम्ही लोक एखाद्या छोट्या बातमीकडं किरकोळ म्हणून बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. आडगाव बुद्रुकमध्ये रस्ता नाही, ही समस्या आम्हाला किरकोळ वाटते आणि आम्ही ती बातमी थोडक्यात मारूनच टाकतो. पण त्यावरच जेव्हा रवीश रिपोर्ट करतो, तेव्हा या समस्येच्या गांभीर्यावर चर्चा करून व्यवस्थेवर आसूड ओढतो. अर्थात हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा अनेक बाबी दररोज होत असतात. म्हणूनच जर रवीशचं कौतुक करताना स्वतःतला रवीश जागा ठेवला तर खऱ्या अर्थानं पत्रकारीता आपण जिवंत ठेऊ असं वाटतं. याची देशाला नितांत गरज आहे.

                                                                                -  विश्वास कोलते AM News Developed by Kalavati Technologies