मी निर्भया बोलतेय... तिच निर्भया जिच्या शरीरावर अनन्वित अत्याचार होत होते... इतकंच काय, मला जिवंत जाळण्यात येत होतं. आणि हे सुरू होतं अशांच्या हातून, ज्यांचा जन्मही एका स्त्रीच्या पोटी झालाय... हीच माणसातच्या रुपामधील जनावरं. ज्यांना स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू वाटते... अशा माणसांची वृत्ती पाहून मला खरंच संताप येतोय. आपण खरंच माणूस आहोत का अशी शंका मला आता येत आहे. कारण माझ्यासोबत जे घडलंय, तसं जंगलातील पशूही वागत नसतील.. इतकं ते हीणकस आणि विकृत होतं.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे मी ऑफिसला निघाले. आपल्याच विचारात ... ती रात्र माझ्यासाठी काळरात्र म्हणून येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. टोलनाक्यावर गाडी लावली आणि पुढे टॅक्सी करत कामाच्या ठिकाणी पोहचले. दिवसभर काम करून संध्याकाळच्या वेळी कामावरून निघाले. नऊच्या सुमारास गाडी लावलेल्या ठिकाणी आले. पाहिलं तर गाडीच्या चाकातील हवा गेलेली. कुठून मदत मिळेल या अपेक्षेनं आजूबाजूला पाहिलं तर तिथं असलेल्या लोकांच्या आतील राक्षसी नजरा माझ्याकडेच पाहत होत्या. त्या वखवखलेल्या नजरा पाहून मी घाबरले. मनात एक अनाहूत भीती वाटायला लागली. भीती दूर करण्यासाठी आणि घडत असलेलं सांगण्यासाठी मी माझ्या लहान बहिणीला फोन केला. गाडी बंद असल्याचंही सांगितलं. त्या लोकांच्या घृणास्पद नजरा मला अजूनही खात होत्या. त्यातच एकाने मला मदतीसाठी विचारलं. मी स्पष्ट नकार दिला. हे सगळं मी बहिणीला कळवत होते. माझं मन काहीतरी इशारा देत होतं. कुणीतरी मदतीला येईल, काहीतरी मार्ग सापडेल या आशेने मी गाडीजवळच थांबले होते. माझी बहिण मला म्हणाली टॅक्सी करून घरी ये. पण का कुणास ठाऊक मी तीचं ऐकलं नाही. ऐकलं असतं तर कदाचित आज मी तुमच्यात असले असते. तुम्हाला माझ्यासाठी मेणबत्या जळाव्या लागल्या नसत्या. निर्भया बाबत मी ऐकलं होतं. पण मी दुसरी निर्भया ठरेन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
गाडीजवळ उभी असलेली मुलगी पाहून थोड्या वेळानं काही लोकं मदतीला आल्याचं सांगून मी फोन कट केला. मदतीच्या बहाण्याने ते चौघे माझ्याकडे आले. मी मदतीच्या अपेक्षेनं त्यांच्याकडे पाहत होते आणि एखादं सावज हाती लागावं त्याप्रमाणे माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न सुरू केला. मी माझी सर्व ताकद लावून त्यांना विरोध करत होते. मात्र, त्या चार राक्षसांपुढे मी हतबल ठरले. तरीही जिवाच्या आकांताने ओरडत होते. पण त्यांनी माझं तोंड बंद केलं. ते सहा तास माझ्यासाठी नरकयातनेप्रमाणे होते... त्या नराधमांनी मला एका निर्जन स्थळी नेलं. मला बळजबरीने दारू पाजण्यात आली. त्यांनी माझ्यावर सामूहिक अत्याचार केला. मी ओरडत होते, किंचाळत होते. पण त्या नराधमांनी माझा तोंड दाबून धरलं होतं. माझा श्वास गुदमरला आणि जीवन -मरणाच्या संघर्षातून माझा पराभव झाला. मी मरण पावले. पुढे त्या नराधमांनी माझ्या निर्जीव शरीराला एका पुलाखाली जाळून टाकलं. एव्हाना माझ्या घरच्या माणसांनी माझा शोध घ्यायला सुरुवात केली होती.
मुलींनो तुम्हाला एक सांगणं आहे. असहाय्य, अबला राहू नका. स्वतःला प्रोटेक्ट करायला शिका. मी माणसातलं जनावर पाहिलं आहे. कदाचित ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. अशावेळी तुम्हालाच तुमचं रक्षण करायचं आहे. स्वतः कालिका, दुर्गा होत संकटाचा सामना करावा लागेल. आता माझ्याबाबतीत असंही बोललं जातंय की बहिणीला फोन करण्याऐवजी पोलिसांना केला असता तर जीव वाचला असता. पण त्यावेळी मला जे सुचलं ते मी केलं. मी घाबरले असल्याने पोलिसांना फोन करणं माझ्या लक्षात आलं नाही.
पण तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे. माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांना, माझ्याशी जनावरासारखं वागणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या. नाहीतर उद्या अनेक निर्भया अत्याचाराच्या बळी ठरतील आणि अत्याचार करणारे हे राक्षस उजळ माथ्यानं फिरत राहतील... दिल्लीतील निर्भयाच्या बाबतीतही असाच प्रकार घडलाय. निर्भया म्हणजे भयमुक्त. परंतु या पुरुषी रुपातील राक्षसांपुढं मी खरंच भयमुक्त आहे का? माझं निर्भया नाव ठेवणं मला जरा विचित्रच वाटतंय. कारण मी कोण आहे, हेदेखील समाजच ठरवत आहे. माझ्यावर अचानक झडप घातली जाते.. मला निष्क्रिय केलं जातं. तुम्ही माझं नाव चांगलं ठेवलंय. पण मी निर्भय राहावं, असं वातावरण तुम्ही निर्माण केलं नाहीत. म्हणून आज या समाजातील बाई केवळ नावाला निर्भय आहे...वास्तविकता याच्या विरुद्ध आहे, असा माझा अनुभव सांगतो.
तुमचीच, दुर्दैवी
सतत भयाखाली वावरणारी निर्भया
- अपूर्वा कुलकर्णी