विधानसभा 2019 : कळमनुरी मतदारसंघ सत्तेच्या विरोधात कौल देणारा मतदारसंघ, कळमनुरीची जनता कुणाच्या बाजूने कौल देणार?

विधानसभा 2019 : कळमनुरी मतदारसंघ सत्तेच्या विरोधात कौल देणारा मतदारसंघ, कळमनुरीची जनता कुणाच्या बाजूने कौल देणार?

कळमनुरी । सत्तेच्या विरोधात कौल देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळं बहुरंगी लढतीची स्थिती निर्माण झाली आहे. सत्तेच्या विरोधात निकाल देणरा मतदारसंघ अशी कळमनुरी मतदारसंघाची ओळख आहे. मात्र रजनीताई सातव आणि राजीव सातव यांनी ही परंपरा खंडीत केली. राजीव सातव राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यापासून त्यांनी संतोष टारफे यांच्यावर मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. मात्र अलिकडील काळात कळमनुरीत काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे. कळमनुरी नगरपालिका काँग्रेसच्या हातातून गेली, तसंच पंचायत समितीत काँग्रेसचं बहुमत असतानाही शिवसेनेने त्यांचा उमेदवार उपसभापती निवडून आणला. याशिवाय टारफेंविरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याचीही चर्चा रंगतेय. त्यामुळं या बाबी टारफेंच्या अडचणी वाढवणाऱ्या ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कळमनुरी मतदारसंघात राजीव सातव यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आहे. हे नेटवर्क भेदताना विरोधकांची कायमच दमछाक झाल्याचं बघायला मिळालं आहे. सध्या देशातील राजकीय परिस्थितीत कळमनुरीत राजीव सातव यांचा करिश्मा कसा चालतो याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे. भाजपचे माजी आमदार गजानन घुगेही कळमनुरीतून जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत.

सध्या कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमकपणे आंदोलन उभारत आहेत. शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांमध्ये बाजीराव सवंडकर, डी के दुर्गे, कृष्णा पाटील जरोडेकर, जिल्हा प्रमुख संतोष बांगर हे निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं चांगली मतं मिळवली. त्यामुळं शिवसेनेच्या इच्छुकांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

याशिवाय अपक्ष उमेदवार अजित मगर हेही निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते जोरदारपणे आंदोलन करत आहेत. त्यामुळं त्यांची मतदारसंघात शेतकरी नेता म्हणून प्रतिमा तयार झाली आहे. या जोरावर ते विधानसभा लढवण्याच्या तयारीला लागले आहेत.

गेल्या निवडणुकीत भाजपला राज्यभरात चांगला विजय मिळालेला असतानाही कळमनुरीतील जनतेनं काँग्रेसच्या संतोष टारफेंकडं मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दिलं. जनतेनं विश्वास ठेवून मला निवडून दिलं आणि मी कामे करीत असताना कसलीही राजकीय सूडभावना ठेवलेली नाही असं टारफेंचं म्हणणं आहे. येत्या निवडणुकीत पुन्हा विजयाचा त्यांना विश्वास आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा मुख्य पक्षांतील इच्छुकांसमोर वंचित बहुजन आघाडीचंही आव्हान येत्या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची भूमिका कळमनुरीत निर्णायक ठरण्याचा अंदाज आहे. त्यामुळं उमेदवारीच्या घोषणेकडं कळमनुरीकरांचं लक्ष लागलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies