नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस सतर्क, पाच अंमलीपदार्थ तस्कर जेरबंद

ठाण्यात अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून तरुणाईचा नशेचा ट्रेण्ड बदलल्याचे दिसून येत आहे

ठाणे । नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस सतर्क झाले असून पाच अंमलीपदार्थ तस्करांना जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून एलएसडी पेपरसह एमडी व चरस या अंमलीपदार्थ असा तब्बल 63 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दरम्यान,वर्षभरात अमलीपदार्थ विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत 178 गुन्ह्यात 260 आरोपीना अटक केली असून तब्बल पावणे दोन कोटींचा मुद्देमाल हस्तगत केल्याने ड्रग तस्करांचे कंबरडे मोडले आहे.

ठाण्यात अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून तरुणाईचा नशेचा ट्रेण्ड बदलल्याचे दिसून येत आहे.नशेखोर तरुण-तरुणींना एलएसडी पेपर या महागड्या नशाप्रकारची भुरळ पडत आहे.तेव्हा,या पेपरची तस्करी करणाऱ्यावर करडी नजर ठेवली होती.या मोहिमेत पोलिसांनी 19 नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या येऊर आणि उपवन परिसरातुन सलमान शेख आणि संजिव उर्फ पॉल रामाध्याय चौहान याना अटक केली.त्यांच्याकडून पोलिसांनी 5 एलएसडी पेपर आणि 2 ग्रॅम मेफेड्रीन पावडर (एमडी) हस्तगत केले.त्यांच्या चौकशीतुन 21 नोव्हे.रोजी पोलिसांनी नितीन मारुती लामतुरे आणि सुशांत संभाजी रसाळ याना अटक केली.त्यांच्याकडून 104 एलएसडी पेपर,56 ग्रॅम एमडी,6.4 ग्रॅम चरस आदी ड्रग्स हस्तगत केले.यासोबतच त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, आणि 98 हजार रोकडही हस्तगत केली.त्यानंतर या चौकडीची अधिक चौकशी केली असता आणखी एक नाव समोर आले.त्यानुसार,29 नोव्हे.रोजी प्रेम राजप्पन अय्यर रा.नेरुळ या तस्कराला 954 एलएसडी पेपरसह मोबाईल फोन व कार असा मुद्देमालासह अटक केली.या पाचही आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 62 लाख 81 हजार 640 रुपये इतकी आहे.

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अंमलीपदार्थ विरोधी पथक सतर्क झाले असले तरी गेल्या वर्षभरात विविध परिमंडळात पोलिसांनी तब्बल 178 गुन्हे दाखल केले असून 260 अंमलीपदार्थ तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेचया तस्करांकडून 1 कोटी 83 लाखांचे एलएसडी पेपर,एमडी,चरस,गांजा आदी अंमलीपदार्थ हस्तगत केले आहेत.आजची तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असल्याने,पालकांनी आपल्या मुलांच्या वागणुकीत आक्षेपार्ह बदल जाणवल्यास वेळीच सतर्क होऊन पोलिसांची मदत घ्यावी.AM News Developed by Kalavati Technologies