आघाडी फुटली आता प्रकाश आंबेडकर या वेळी नक्की कुणाची ‘वाजवणार? - शिवसेना

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीची जोरदार चर्चा झाली.

मुंबई | वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय MIM पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अखेर मंगळवारी जाहीर केला आहे. मागील आठवड्यातच प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षाची भूमिका मांडली होती. यावर 'ही भूमिका एकट्या जलील यांची नसून पक्षाची आहे', अशी माहिती असदुद्दीन यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. आता या घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून आपले मत व्यक्त केले आहे.

सामना संपादकीयमध्ये काय?
- लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीची जोरदार चर्चा झाली. मात्र आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘वंचित’ का फुटली, यावर खल होत आहे. काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवण्याइतक्या जागा मिळवता आल्या नाहीत. आता महाराष्ट्र विधानसभेतही वेगळे काय घडणार आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता कोण हे निवडणुकीआधीच जाहीर केले. ‘या वेळी विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचाच’ असा फटका त्यांनी मारला. चंद्रकांत पाटलांनी निवडणुकांची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेता जाहीर केला. अजून बाजारात तुरी आहेत. तोवर या गमती जमतीचा आनंद घेत राहू.

- आम्हाला आश्चर्य वाटते ते प्रकाश आंबेडकर व मियाँ ओवेसी यांच्या दोस्तान्यात पडलेल्या मिठाच्या खड्याचे. लोकसभेदरम्यान मियाँ ओवेसी व प्रकाश आंबेडकर हे ‘एक जान हैं हम’ याच थाटात वावरत होते. ओवेसी यांनी तर एका जाहीर सभेत प्रकाशरावांना उचलूनच घेतले होते. त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची सळसळ तेव्हा सुसाट सुटली होती. मात्र याच वंचित बहुजन आघाडीत आता उभी फूट पडली आहे.
- एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्याच आठवड्यात वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. प्रकाश आंबेडकर मात्र जोपर्यंत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत युती कायम आहे, असा खुलासा करीत होते. तथापि आता खुद्द ओवेसी मियाँनीही जलील यांचीच री ओढली आहे. जलील हे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना महाराष्ट्रबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल असे ओवेसी म्हणाले आहेत.
- एकप्रकारे वंचित आणि एमआयएम यांची युती तुटण्यावर त्यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर पुढे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. प्रकाश आंबेडकर हे बुद्धिमान असले तरी हेकेखोर स्वभावामुळे ही आघाडी फार काळ टिकणार नाही असे भाकीत अनेकांनी केले होते. ते इतक्या लवकर खरे ठरेल असे वाटले नव्हते. लोकसभेत ‘वंचित’ने काँग्रेस-राष्ट्रवादीस जोरदार धक्का दिला, पण विधानसभा निवडणुकीआधी एमआयएम आणि आंबेडकर यांच्या वंचितमध्ये बेबनाव झाला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले, ‘‘आर.एस.एस.वाले आंबेडकरांचे कान भरत आहेत. त्यामुळेच आंबेडकर एमआयएमला झुलवत ठेवत आहेत.’’ जलील यांचे म्हणणे सत्य असेल तर प्रकाश आंबेडकर या वेळी नक्की कुणाची ‘वाजवणार’ हा प्रश्न निर्माण होतोच.

- वंचितांचे दुःख हे कायम कुणाच्या तरी वळचणीलाच आश्रित म्हणून पडून राहिले. म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांचा ‘स्वबळावर एकला चलो रे’चा नारा महत्त्वाचा वाटतो. ते काँग्रेसच्या वळचणीस गेले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रवादीस वगळून काँग्रेसलाच 144 जागांची ‘ऑफर’ केली. हा आत्मविश्वास येतो कुठून हे रहस्यच आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीची जोरदार चर्चा झाली. मात्र आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘वंचित’ का फुटली, यावर खल होत आहे.
- काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवण्याइतक्या जागा मिळवता आल्या नाहीत. आता महाराष्ट्र विधानसभेतही वेगळे काय घडणार आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता कोण हे निवडणुकीआधीच जाहीर केले. ‘या वेळी विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचाच’ असा फटका त्यांनी मारला. चंद्रकांत पाटलांनी निवडणुकांची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेता जाहीर केला. अजून बाजारात तुरी आहेत. तोवर या गमती जमतीचा आनंद घेत राहू.AM News Developed by Kalavati Technologies