‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’पुस्तक म्हणजे ढोंग व चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना - शिवसेना

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले.

मुंबई | ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक म्हणजे ढोंग व चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातून सपकन तलवार काढावी. ती आता काढली आहे व त्याबद्दल त्यांचे आभार! भाजपची तोंडे ‘म्यान’ झाली म्हणून आम्ही हे शिवव्याख्यान मांडले. असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाजपवर टीकास्त्र डागण्यात आले आहे.

अग्रलेखात काय ?
- ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाले. महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेला हे अजिबात आवडले नाही. श्री. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय? याचे उत्तर एका सुरात ‘नाही…नाही!’ असेच आहे.
- महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे.
- पंतप्रधान मोदी यांनाही ही तुलना आवडली नसेल, पण फाजील उत्साही भक्त आपल्या नेत्यांना अडचणीत आणतात तसे आता झाले आहे. शिवरायांनी औरंगजेबाच्या मस्तकावर पाय देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तसेच ‘‘औरंगशहाला स्वतःलाच दिल्लीत कोंडीन’’ हे छत्रपतींचे वाक्य इंग्रजी रेकॉर्डस्मध्ये आहे. हीच शिवरायांची प्रतिमा आहे.



AM News Developed by Kalavati Technologies