पोलादपूर तालुक्यातील महादेवाचा मुरा येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

गावमध्ये महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.

रायगड | पोलादपूर तालुक्यातील दुर्गम विकासापासून वंचित असलेल्या महादेवाचा मुरा येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार एकजुटीने केला आहे. राजकीय व प्रशासकीय अनास्थेपोटी दुर्लक्षित राहिलेल्या महादेव मुरा येथील ग्रामस्थांनी गावापर्यंतचा रस्ता यंदा दुभंगल्याने रहदारी बंद झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व शासनाने विविध अधिकारी यांनी लक्ष न दिल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्धार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गावमध्ये महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षी झालेल्या पावसात सर्वत्र सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणच्या नळ पाणी योजना बाधित झाल्या होत्या. बोरघर व गोवले या दोन ग्रामपंचायतींमध्ये गाव जोडले गेले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई कायम त्यातच संसाराचा गाडा अद्याप चुलीवर आहे. या गावातील अंगणवाडी, प्राथमिक शाळा या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन फेऱ्यात असून नसल्या सारख्या झाल्या आहेत. या शाळेतील मुले पुढे शिक्षणासाठी साखर, उमरठ आदी शाळामध्ये जात आहेत. अनेक जण नोकरीसाठी बाहेर गावी गेले आहेत. बोरघर ग्रामपंचायत हद्दीत 200 तर गोवले ग्रामपंचायत हद्दीत 120 लोकसंख्या आहे. आता या गावाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.AM News Developed by Kalavati Technologies