मुंबई । भारतात येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरूवात होत असून, मंगळवारी पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटमधून 'कोव्हिशिल्ड' लसीचा पुरवठा देशातील विविध भागात पाठवण्यात आला. कोरोना बहुप्रतिक्षित लसीचा पहिला साठा राज्याची राजधानी मुंबईत पोहोचला आहे. कोव्हिशिल्ड लसीचे 1 लाख 39 हजार 500 डोस आज पहाटे साडेपाच वाजता मुंबई पाठवण्यात आले असून, हा साठा पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
मुंबई पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला आहे. लस आणता वेळी पोलीसांची दोन वाहनं सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात होती. कोरोना लस साठवणूकीसाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज तयार करण्यात आले आहे. या स्टोरेजची क्षमता 1 कोटी डोस साठवून ठेवण्या इतकी आहे. मात्र याचं काम पुर्णपणे होऊ शकलेलं नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने आणलेल्या लसीचा साठा परळ येथील आरोग्य विभागाच्या कार्यालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर संबंधित कर्मचारी अशा 2 लाख व्यक्तींची नावे कोविन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख जणांना लस दिली जाणार आहे.