वादानंतर 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तक अखेर मागे, प्रकाश जावडेकरांनी दिली माहिती

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई | भारतीय जनता पक्षाचे नेता जय भगवान गोयल यांचे 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तक अखेर मागे घेण्यात आले आहे. या पुस्तकावरुन प्रचंड गदारोळ झाला. मात्र यानंतर या पुस्तकावरुन सुरू झालेल्या वादावर भाजपने अखेर पडदा टाकला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा भाजपशी कोणताही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली आहे आणि पुस्तकही मागे घेण्यात आले आहे. हा वाद आता संपला आहे. असे ट्विट करुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही' असे ट्विटही प्रकाश जावडेकरांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वादग्रस्त तुलना केल्यामुळे देशभरासह संपूर्ण महाराष्ट्रात रोष पाहायला मिळत आहे. मात्र या पुस्तकाचे लेखक आणि भाजप नेते जयभगवान गोयल हे आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पुस्तक आता मागे घेण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies