अरे देवा ! तीन दिवसाच्या PPE कीटसाठी आकारले 27 हजार रुपये बिल

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला केवळ पीपीई कीटचे 27 हजार रुपये बिल आकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठाणे | कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला केवळ पीपीई कीटचे 27 हजार रुपये बिल आकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे कोरोना आजाराची रुग्णांना भीती दाखवून खासगी रुग्णालयात लुटीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढत्या संख्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे अन्य आजाराच्या रुग्णांना कोरोनाचा फटका बसत आहे. काही खासगी रुग्णालयात अन्य आजाराच्या रुग्णांना रुग्णालये उपचारासाठी दाखल करुन घेत नाहीत.

जर दाखल करुन घेतलेच तर त्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल उकळले जात असल्याचा प्रकार कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात समोर आला आहे.या रुग्णालयात कल्याण पूर्वेत राहणारे रविंद्र राजभर हे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असलेल्या एका मल्टीस्पेशलीस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर रवींद्र यांना त्या खासगी रुग्णालयातील मॅनेजमेंटने उपचाराचे बिल त्याच्या हाती दिले. तेव्हा त्या बिलात तीन दिवसात पीपीई कीटचे 27 हजार रुपये आकारल्याचे नमूद केले. हा प्रकार राजभर यांच्या नातेवाईकांनी कल्याण पूर्व मधील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगितला.

त्यानंतर नगरसेवक महेश गायकवाड यांनी रुग्णालयात धाव घेऊन त्या रुग्णालय प्रशासनास धारेवर धरत बिलाची रक्कम कमी करून घेतली. यापुढे रूग्णांकडून जादा रक्कमेची लूट केली. तर गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही या खासगी हाॅस्पिटला नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies