नवरात्रोत्सवावर कोरोनाचं सावट; शेकडो वर्षानंतर प्रथमच दुर्गाडी परिसर शांत

नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली असून, कोरोनामुळे गजबलेले मंदिर यंदा मात्र शांत आहे

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शेकडो वर्षानंतर प्रथमच दुर्गाडी येथील नवरात्रोत्सवात खंड पडला आहे. दुर्गामातेच्या परिसरात असलेला शुकशुकाट भयाणतेत भर घालत असून, प्रवेश द्वारावरील पायऱ्या बांबू बांधून बंदिस्त करण्यात आल्या आहेत. उत्सव समितीने राज्य शासनाकडे उत्सव करण्यासाठी परवानगी मागितली असता, उत्सव साजरा करण्यास परवनागी न देता केवळ नवरात्रीत देवीची पूजा अर्चना आणि आरती करण्यासाठी चार व्यक्तीना मंदिरात प्रवेश करण्याची परवनगी देण्यात आली आहे.

कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या दुर्गाडी देवी ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रीच्या काळात देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्त तासंतास रांगेत राहणे पसंत करतात. नऊ दिवसात लाखो भक्त दर्शनासाठी येत असल्यामुळे, मंदिर ट्रस्टकडून साडेतीन शक्तीपीठाचा देखावा साकारण्या बरोबरच भक्तांना दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवक नेमले जातात. नवरात्रीच्या आधीच 15 दिवस मंदिर परिसर लाईट आणि तोरणाच्या झगमगाटात उजळून निघतो.

शासनाकडून राज्य राखीव दलाची 12 कर्मचाऱ्यांची हत्यारबंद तुकडी याठिकाणी सतत कार्यरत असून, या पोलीस कर्मचाऱ्यांचा या किल्लावर आणि मंदिर परिसरात वावर सोडला तर कोरोना लॉकडाऊनमुळे या मंदिराला रितेपणा जाणवत आहे. दरम्यान याबाबत उत्सव समितीचे अध्यक्ष आमदार विश्वनाथ भोईर यांना विचारले असता, त्यांनी दुर्गाडी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडे तसेच पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र कोरोनाचा पुन्हा कहर होण्याची भीती असल्यामुळे यंदा उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यास नकार देण्यात आला आहे. मात्र नवरात्रीच्या काळात फक्त चार लोकांना देवीची पूजा, अर्चना आणि नैवद्यसह धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली असून, त्याच पद्धतीने यंदा दुर्गाडी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव होणार असल्याचे त्यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies