धक्कादायक ! नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, हळदीला हजर असलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी

नेरे गाव संपूर्ण लॉकडाउन गावातील हळदी समारंभ भोवला तिघांवर गुन्हा दाखल..

पनवेल | पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच पनवेलजवळच्या नेरे गावात लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात हजर राहिलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामागचे कारण म्हणजे नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने, प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

नेरे गावातील वामन पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या हळदीला चारशे ते पाचशे लोकांपेक्षा जास्त लोकांना आमंत्रित करुन मुलाची थाटामाटात हळद केली होती. त्यानंतर 23 जून रोजी नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 90 जणांची चाचणी करण्यात येणार आहे. तर नेरे परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याप्रकरणी नवरदेव मुलाचे वडिल वामन पाटील, नवरा मुलगा व वधुच्या वडिलांवर पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या टप्यात 90 पैकी 27 जणांची चाचणी करण्यात आली आहे. उर्वरित लोकांची चाचणी होणार आहे. दरम्यान 25 जून रोजी पनवेलचे प्रांत दत्तात्रय नवले, तहसीलदार अमित सानप आदींनी येथील परिसराची पाहणी केली. परिसरात कोणीही विनापरवाना लग्नसोहळ्यांचे आयोजन करु नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसंच लग्नासाठी तहसील कार्यालयातून परवानगी देण्यात येते, रितसर परवानगी घेऊन लग्नसोहळे करावेत असं प्रशासनाने बजावलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies